औरंगाबाद : शनिवारी सुटीचा दिवस असतानाही ‘समांतर’ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे; मात्र सभेला स्वत: आयुक्त डॉ. निपुण विनायकच उपस्थित राहणार नसल्याने सत्ताधाऱ्यांना हा विषय आता पुन्हा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय उरला नाही. यामुळे ‘समांतर’ला शनिची वक्रदृष्टी लागली असल्याचे दिसत आहे.
शहरातील १५ लाख नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीबाबत मागील एक महिन्यापासून महापालिकेत अक्षरश: टोलवाटोलवी सुरू आहे. कंपनीचे अधिकारी भेटायला तयार नसल्याने वारंवार हा विषय पुढे ढकलण्यात येत असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. आयुक्त डॉ. विनायक यांनी मागील महिन्यातच समांतर जलवाहिनीसंदर्भात सर्वसाधारण सभेसमोर ठराव मांडला आहे. पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी कायगाव येथे पहिली आत्महत्या झाल्याने हा विषय पुढे ढकलण्यात आला होता. ६ आॅगस्ट रोजीही सत्ताधाऱ्यांनी दिवसभर सर्वसाधारण सभा चालवूनही समांतरवर चर्चा केली नाही. शनी अमावास्येच्या दिवशी म्हणजेच ११ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता सभा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. शनी अमावास्या आमच्यासाठी चांगली असल्याची प्रतिक्रियाही महापौरांनी नोंदविली होती.
शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तीन दिवसांची सुटी टाकली आहे. त्यांना वैयक्तिक कारणासाठी मालेगाव, चंदीगढ येथे जायचे आहे. शनिवारी सकाळीच ते रवाना होणार आहेत. आपण सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकणार नाही, याची पूर्वसूचना महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आल्याचे आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग किंवा डी. पी. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सत्ताधाऱ्यांना सभा चालवावी लागेल. समांतरचा मूळ ठराव आयुक्तांनी ठेवला असल्याने त्यांच्या उपस्थितीतच चर्चा व्हावी अशी नगरसेवकांची मागणी आहे. सभेत आयुक्त उपस्थित राहणार नसल्याने दुसऱ्या विषयांवरच चर्चा अपेक्षित आहे.
समांतरने वर्षभरात शहरात पाणीयेत्या वर्षभरात जायकवाडी धरणातून समांतरने शहरात पाणी आणल्या जाईल, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी येथे दिली. ‘क्रेडाई’ बांधकाम व्यावसायिकांच्या स्थानिक शाखेच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी, महापौर नंदकुमार घोडेले यांनी समांतरचा मुद्दा उपस्थित केला. त्यास उत्तर देताना परदेशी म्हणाले की, समांतरमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. यासंदर्भात बैठकाही घेतल्या आहेत. पुढील नियोजन लक्षात घेता येत्या वर्षभरात समांतरने पाणी शहरात आणल्या जाईल, अशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.