पैठण : सिंचनपंप सुरु करण्याचा प्रयत्न करणारी २१ वर्षीय विवाहीत महिला तोल जाऊन पडल्याने जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात वाहून गेली आहे. रात्री उशिरापर्यंत कालव्यात महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू होते. मात्र यश आले नाही. वाहून गेलेल्या महिलेला १० महिन्यांचे तान्हे बाळ असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कालव्यातून सिंचनासाठी पाणी ओढण्यासाठी तुळजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी विद्युत पंप कालव्यात सोडलेले आहेत. विद्युत पंप सुरू करताना पंपात पाणी भरावे लागते. पंपात पाणी भरण्यासाठी कालव्यातून बकेटने पाणी भरताना तुळजापूर येथील रेखा अक्षय सोनवणे यांचा तोल गेला आणि त्या कालव्यात पडल्या. दरम्यान कालव्यास १२०० क्यूसेक्स क्षमतेने विसर्ग सुरू असल्याने गतीमान कालव्याच्या प्रवाहात त्या वाहून गेल्या. परिसरातील ग्रामस्थांनी कालव्यात उड्या मारून वाहून जात असलेल्या महिलेचा पाठलाग केला परंतू यश आले नाही. दोन किलोमीटर अंतरावर सदर महिलेची पाण्याची बकेट हाती लागली असल्याचे माजी सभापती सुरेश दुबाले यांनी सांगितले.