औरंगाबाद : कटकट गेट भागातील २२ एकर २१ गुंठे जमीन रविवारी एनिमी प्रॉपर्टी म्हणून घोषित करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी नगर भूमापन कार्यालयाच्या सहकार्याने कटकट गेट भागात सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
भारताच्या फाळणीप्रसंगी अनेक नागरिक पाकिस्तानात गेले. त्यांची जमीन, घरे, ‘एनिमी प्रॉपर्टी’ अर्थात शत्रूची संपत्ती म्हणून केंद्र सरकारच्या वतीने गृहीत धरण्यात येते. औरंगाबाद शहरात प्रथमच कटकट गेट भागातील २२ एकर २१ गुंठे जमिनीचे पीआर कार्ड, सातबारा रद्द करण्यात आले. या जागेची मालकी केंद्र शासनाची दर्शविण्यात आली. या प्रक्रियेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जागा ताब्यात घेतल्याचा अहवाल शासनाला द्यावा लागेल. त्यामुळे जिल्हा प्रशासन पुढील आठवड्यात म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी नगर भूमापन कार्यालयाच्या सहकार्याने सर्वेक्षण करणार आहे. त्यापूर्वी नागरिकांना नोटिसा दिल्या जातील. एकूण जागेची मार्किंग करण्यात येईल. घरे पाडायची का, घरे रिकामी करून जागा ताब्यात घ्यायची, हे प्रशासनाने अद्याप निश्चित केले नाही. विशेष बाब म्हणजे एनिमी प्रॉपर्टी अंतर्गत कायद्यात न्यायालयात दाद मागण्याची परवानगी नाही. एनिमी प्रॉपर्टीसंदर्भातील कार्यालय मुंबईत आहे.
नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न-कटकट गेट भागातील कोणते नागरिक पाकिस्तानात गेले. त्यांची नावे काय?- १९५० पासून जमीन अब्दुल वहाब अब्दुल सत्तार यांच्या नावाने कशी?- एनिमी प्रॉपर्टी घोषित करण्यापूर्वी कायद्यानुसार नोटिसा, सुनावणी का नाही?- एनिमी प्रॉपर्टी कार्यालयाकडे सहा महिन्यांपूर्वी पुरावे सादर, तरी दुर्लक्ष का?