औरंगाबाद : आई-वडील राजकारणात असल्याने लहानपणापासून नागरी सेवेचे महत्त्व उमगले होते. त्यामुळे नागरी सेवेत जाण्याचा निर्धार होता. तिसऱ्या प्रयत्नात सुवर्ण यश गाठले. हे आईवडिलांनी दिलेले अभ्यासाचे स्वातंत्र्य आणि प्रोत्साहनाचे फलित असल्याची भावना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून ५१९ वी आलेल्या ऊर्जा जैन यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
माजी महापौर विकास जैन (रा. वेदांतनगर) आणि माजी नगरसेविका अल्पा जैन यांची मुलगी ऊर्जा हिचे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण नाथ व्हॅलीमध्ये झाले आहे. दक्षिण मुंबईतील सोफिया महाविद्यालयात तिने अर्थशास्त्र विषयातून अर्थशास्त्र विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तिने अर्थशास्त्र हा विषय घेतला. पहिल्या दोन प्रयत्नात यश मिळाले नाही. मात्र, हार न मानता तिने जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. दुसऱ्या प्रयत्नात थोडक्यात संधी हुकली होती. त्यामुळे तयारीनिशी तिसऱ्यांदा ऑक्टोबर २०२० मध्ये लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा दिली. शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात ऊर्जाने देशातून ५१९ वी येत शहराची मान उंचावली. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनीही ऊर्जा यांच्याशी संपर्क साधत यशाबद्दल कौतुकाची थाप देत पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
---
आयएफएसचे स्वप्न
इंडियन फाॅरेन सर्व्हिस (आयएफएस) या सेवेत नोकरीचे स्वप्न लहानपणापासून आहे. यावेळी आवडती सेवा न मिळाल्यास रॅंक उंचावण्यासाठी पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेईल. असे ऊर्जा जैन लोकमतशी बोलतांना म्हणाल्या.
अभ्यासासाठी सात वर्षांपासून घरापासून दूर
शहरात बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर मुंबईत शिकायला गेल्यापासून सात वर्ष घरापासून दूर आहे. कोरोनाकाळातही घराच्यापांसून दूर दिल्लीत अभ्यासात व्यस्त होते. गेली सहा-सात वर्ष घरापासून दूर राहून अभ्यासाचे स्वातंत्र्य आईवडिलांनी दिले. शिवाय प्रोत्साहन देत यशाचा विश्वास दिल्याने हे सोनेरी यशही त्यांचेच असल्याचे ऊर्जा म्हणाल्या.