औरंगाबाद: कर्जबाजारी झालेल्या तरुणाने कट रचून चक्क दोन मित्रांकडून स्वतः चे घर फोडल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी गारखेडा परिसरातील रेणुकानगरात घडली. या घटनेत सुमारे पावणे दोन लाखाचे दागिने पळविणाऱ्या तरुणासह त्याच्या मित्रांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. घरमालक दिनेश देवीदास शिंदे त्याचे मित्र सुमीत गुलाबराव प्रसाद आणि कृष्णा साहेबराव लघाने (रा. रेणूकानगर ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपी दिनेश अभियांत्रिकीचे तर सुमीत बीएसस्सीचे शिक्षण घेत आहे.
पोलिसांनी सांगितले की , रेणूकानगरातील रहिवासी उषा देविदास शिंदे या दिवाळीनिमित्त पतीसह शिंदेफळ(ता. सिल्लोड) येथे गेल्या होत्या. घरी असलेला त्यांचा एकुलता मुलगा दिनेश हा १५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून गावी गेला. रात्री १०:३० वाजेच्या सुमारास त्यांचे भाडेकरू रवी बनकर यांनी शिंदे यांना फोन करून तुमच्या घराचे दार उघडे असल्याचे कळविले. चोरी झाल्याच्या संशयाने उषा यांनी दिनेशसह तातडीने औरंगाबादला गाठले. ते घरी आले तेव्हा घराच्या दाराचा कडीकोंडा तुटलेला होता शिवाय आतील कपाट उचकटून सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. लोखंडी ड्रममध्ये लपवून ठेवलेली सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे पावणे दोन लाखाचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी उषा यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. घटनेची माहिती कळताच सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब मुळे , हवालदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, रवी जाधव, राजेश यदमळ, कल्याण निकम, जालिंदर मांटे , दिपक जाधव , आणि अजय कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान उषा यांचा मुलगा दिनेश हा व्यसनाधिन असून तो कर्जबाजारी असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी संशयावरून दिनेशची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला.
संशय बळावताच पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुंह्याची कबुली देत कर्ज फेडण्यासाठी सुमित आणि कृष्णाकडून ही चोरी करून घेतल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी सुमीत आणि कृष्णाला उचलले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरलेले दागिने एका वित्तीय संस्थेकडे गहाण ठेवून ८५ हजार रुपये कर्ज घेतल्याचे सांगितले. तर कृष्णाच्या घरातून ६७ हजार रुपये जप्त केले . मात्र लॉकडाउन कालावधीत त्याचे काम सुटले त्याला दारूचे व्यसन आहे . यात तो कर्जबाजारी झाल्याने काही दिवसांपूर्वी काही तरुण त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी आले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने मित्रांकडून स्वतःच्या घरातच चोरी करण्याचा प्लॅन केला आणि तडीस नेला.
असा झाला भांडाफोड शिंदे यांच्या गेटचे कुलूप गायब होते. शिवाय कुलूप तोडल्याच्या खूना दिसत नव्हत्या. यामुळे ही चोरी ओळखीच्या व्यक्तीने केली असावी असा संशय होता. शिंदे दांपत्याने ज्या लोखंडी ड्रममध्ये दोन उशाच्या आत कापडी पिशवीत दागिने लपवून ठेवले होते . तीच पिशवी चोरांनी नेली होती. पोलिसांनी दिनेशकडे विचारपूस केली तेव्हा तो घाबरून गेल्याचे दिसल्याने पोलिसांना संशय आला.