औरंगाबाद : मुकुंदनगर येथील मारोती मंदिराच्या सभागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याने १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. कंत्राटदाराने १ लाख रुपये देण्याचे कबूल करीत त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. त्यानुसार एसीबीने लावलेल्या सापळ्यात १ लाख रुपयांपैकी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता रंगेहाथ पकडला आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
लाच घेणाऱ्या शाखा अभियंत्याचे नाव संजय राजाराम पाटील (५२,रा. डी १, गुरुगणेश अपार्टमेंट, रिद्धी सिद्धी हॉलच्या बाजूला, उल्कानगरी) असे आहे. मुकुंदनगर येथील डेकोरेशनचा व्यवसाय असलेल्या एका व्यक्तीने परिसरातील मारोती मंदिराच्या सभागृहाच्या बांधकामाचे कंत्राट घेतले होते. या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कामाच्या बिलासाठी तक्रारदार बांधकाम विभागाच्या पदमपुरा येथील कार्यालयात चकरा मारीत होते. बिल मंजूर होत नसल्यामुळे शाखा अभियंता पाटील याची भेट घेतली. तेव्हा कंत्राटदाराकडे १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोडीअंती १ लाख रुपये शाखा अभियंत्यास देण्याचे कंत्राटदाराने मान्य केले. मात्र, लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे कंत्राटदाराने थेट एसीबीकडे धाव घेत १० मार्च रोजी तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अभियंता पाटील याने लाच मागितल्याचे आढळून आले. त्यानुसार शनिवारी (दि.१२) दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी पाटील याने कंत्राटदाराकडून १ लाख रुपयांपैकी ४० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल तांबे, उपअधिक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांच्या पथकाने केली.
घराजवळील रस्त्यावर स्वीकारले पैसेशाखा अभियंता संजय पाटील याने उल्कानगरीतील रिद्धीसिद्धी हॉलसमोरील रस्त्यावरच ४० हजार रुपयांचा लाच स्वीकारली. पैसे घेताना साधे चहा-पाणीसुद्धा तक्रारदाराला विचारले नाही. पाटील याचे घरही हाकेच्या अंतरावर होते. या कारवाईमुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.