औरंगाबाद : यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी दोन वेळा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात आली असून, या परीक्षेचा निकाल २८ नोव्हेंबरपर्यंत अपेक्षित आहे. तथापि, यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे नवीन शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ मध्ये सुरू होईल, असा विश्वास राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने व्यक्त केला आहे.
कोरोना महामारीमुळे यंदा शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी साधारणपणे ऑगस्टपासून सुरू होत असते. मात्र, लॉकडाऊनमुळे ‘सीईटी’चे नियोजन रखडले. ऑक्टोबरमध्ये ‘सीईटी’ची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. मात्र, त्या महिन्यात काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे, तर मुंबई विभागात वीजपुरवठा बाधित झाल्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिले होते. त्यांच्या भवितव्याचा विचार करून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अशा विद्यार्थ्यांसाठी ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा ऑनलाईन ‘सीईटी’ घेतली. या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. तो २८ नोव्हेंबरपर्यंत जाहीर केला जाईल, असा विश्वास राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे अधिकारी एस.के. महाजन यांनी व्यक्त केला आहे. ‘सीईटी’चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागविले जातील. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या (राऊंड) सुरू होतील. दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश देणे सुरू होईल. यासाठी डिसेंबर महिन्यात ही संपूर्ण प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू होतील.
सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश रखडलेयासंदर्भात राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे अधिकारी एस.के. महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, लॉकडाऊनमुळे यंदा सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’बाबतचे नियोजन विस्कळीत झाले. ‘सीईटी’ घेण्याबाबत दोन वेळा नियोजन केले होते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पहिली ‘सीईटी’ १ ते ३० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आली. मात्र, पूरपरिस्थिती, अतिवृष्टी आणि मुंबईत बाधित झालेला वीजपुरवठा यामुळे अनेक विद्यार्थी ‘सीईटी’पासून वंचित राहिले होते. तंत्रशिक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा ‘सीईटी’ घेतली. २८ नोव्हेंबरपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. त्यानंतर लगेच पुढील प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.