लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अभियांत्रिकीसह एमबीए, एमसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सादर करणे अत्यावश्यक आहे. अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जनजागृती नसल्यामुळे नियम जाहीर होताच हजारो विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केले. मात्र जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्यामुळे अभियांत्रिकीच्या नोंदणीला फटका बसला आहे. यामुळे प्रवेश नियम परिषदेच्या बैठकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यावर्षीपासून जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सादर करणे बंधनकारक केले. याविषयीच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या असल्यामुळे त्यात राज्य सामाईक परीक्षा कक्षाने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. मात्र यासंबंधी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती नसल्यामुळे अनेकांनी ऐनवेळी प्रमाणपत्र काढण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र जातपडताळणी कार्यालयामध्ये नुकत्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या, सुट्ट्या आणि अपुºया कर्मचारीवर्गामुळे हजारो विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्रे निर्णयाविना पडून आहेत.या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी राज्यभरातून सुरू आहे. याविषयी ‘लोकमत’ने सर्वात अगोदर ८ जून रोजी वृत्त प्रकाशितकेले.या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. याचा फटका अभियांत्रिकीच्या नोंदणीला बसला आहे. मागील वर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी मराठवाड्यातून १३ हजारांपेक्षा अधिक नोंदणी झाली होती. मात्र यावर्षी आॅनलाईन नोंदणीला अवघे दोन दिवस उरले असताना केवळ ५ हजार ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पुढील दोन दिवसात सरासरीपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी होईल, अशी अपेक्षा देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. प्रवेश नियम परिषदेची शुक्रवारी मुंबईत बैठक झाली आहे. या बैठकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
अभियांत्रिकी नोंदणीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:51 AM