औरंगाबाद : पीएम केअर फंडातील नादुरुस्त व्हेंटिलेटर कंपनीचे इंजिनिअर्स बुधवारपासून दुरुस्तीचा खटाटोप करीत आहेत. एक एक व्हेंटिलेटर दुरुस्त केल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते, पण रुग्णांना हे व्हेंटिलेटर लावेपर्यंत ते पुन्हा नादुरुस्त होत आहेत. एक-दोन नव्हे, तर तब्बल ५ व्हेंटिलेटर दुरुस्तीनंतरही रुग्णांसाठी निरर्थक ठरले. अशा अवस्थेने इंजिनिअर्सही आता हतबल बनले आहेत. तरीही व्हेंटिलेटर दुरुस्तीचा अट्टाहास कायम असून, आता थेट ज्यांनी व्हेंटिलेटर बनविले, ते ‘व्हेंटिलेटर मेकर’ शहरात बोलविण्यात आले आहेत.
घाटी रुग्णालयाला प्राप्त पीएम केअर फंडातील १५० व्हेंटिलेटर नादुरुस्त आणि आयसीयुत वापरण्यायोग्य नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने गेले दोन दिवस वृत्त प्रकाशित करून समोर आणला. यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. घाटीतील मेडिसीन विभागात पीएम फंडातील व्हेंटिलेटर एका कक्षात ठेवण्यात आले आहेत. हा कक्ष नादुरुस्त व्हेंटिलेटरच्या गर्दीने भरून गेला आहे. याठिकाणी संबंधित कंपनीचे इंजिनिअर्स आणि तंत्रज्ञ व्हेंटिलेटर दुरुस्तीचा प्रयत्न करीत आहेत. व्हेंटिलेटर दुरुस्त होत असल्याचा दावा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. याविषयी मेडिसीन विभागातील तज्ज्ञांना विचारले असता, आतापर्यंत ५ व्हेंटिलेटर दुरुस्त करण्यात आले, हे व्हेंटिलेटर रुग्णांना लावले, परंतु त्यांचा काही उपयोगच झाला नाही. कारण रुग्णांच्या ऑक्सिजनची पातळी वाढतच नाही. उलट कमी होते. व्हेंटिलेटरच्या अशा अवस्थेमुळे ज्यांनी व्हेंटिलेटर बनविले, तेच आता येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. साॅफ्टवेअरही योग्य प्रकारे काम करीत नसल्याची स्थिती आहे.
काय आहे घाटीतील तज्ज्ञांचा ६ मे रोजीचा अहवाल- घाटीत १२ एप्रिल रोजी व्हेंटिलेटर दाखल झाले. त्यानंतर १८ एप्रिल रोजी काही व्हेंटिलेटर एमआयसीयु, आयसीयुला वितरित करण्यात आले. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याविषयी तक्रारी आल्या. २३ आणि २४ एप्रिल रोजी इंजिनिअर्स आले. त्यांनी दोन दिवस व्हेंटिलेटर दुरुस्तीचा प्रयत्न केला. काही भाग बदलावे लागतील आणि त्याविषयी त्यांनी वरिष्ठांना कळविले. दोन व्हेंटिलेटर दुरुस्त केले. परंतु रुग्णांची ऑक्सिजन (सॅच्युरेशन) पातळी वाढत नाही.- घाटीतील तज्ज्ञांनी व्हेंटिलेटर काम करीत नसल्याचे कळविले, तेव्हा आवश्यक पार्टची ऑर्डर देण्यात आल्याचे, याविषयी वरिष्ठांना कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले. संबंधीत इंजिनिअर्स अन्य ठिकाणी कामात व्यस्त होते. अनेकदा घाटीतील तज्ज्ञांचा फोनही घेतला नाही.
- निष्कर्ष :१) सदर व्हेंटिलेटर कोरोना रुग्णांच्या वापरायोग्य नाहीत.२) व्हेंटिलेटरवर रुग्णांची ऑक्सिजनची पातळी कमी होते.३) सदर व्हेंटिलेटर आयसीयुत वापरण्यासाठी योग्य नाहीत.
खासगी रुग्णालयांना देण्याचा निर्णयघाटीत १२ एप्रिल रोजी १०० व्हेंटिलेटर पोहोचल्यानंतर त्यांची अवस्था घाटीकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आली. दोन तास बैठकीत चर्चा करण्यात आली. तरीही व्हेंटिलेटर घेण्यात आले. घाटीला आलेले हे व्हेंटिलेटर अन्य जिल्ह्यांना, खासगी रुग्णालयांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती घाटीतून मिळाली.
नादुरुस्त व्हेंटिलेटर घाटीत ठेवण्यासाठी दबावघाटी रुग्णालयात पीएम फंडातील १४ व्हेंटिलेटर नादुरुस्त अवस्थेत असून, ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर ५० व्हेंटिलेटर खोक्यात बंद आहेत. व्हेंटिलेटरची अवस्था समोर येऊनही हे व्हेंटिलेटर घाटीतच ठेवले जात आहेत. त्यासाठी काही राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी घाटी प्रशासनावर दबाव टाकत आहेत. केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर नाकारल्यास कारवाईची भीती दाखविली जात असल्याचे समजते.
खासगी रुग्णालयांची सरकारी व्हेंटिलेटरमधून कमाईपीएम केअर फंडातून १२ एप्रिल रोजी मिळालेले १०० पैकी ३१ व्हेंटिलेटर शहरातील ४ खासगी रुग्णालयांना देण्यात आले. जे व्हेंटिलेटर घाटीसाठी आले होते ते सरळ खासगी रुग्णालयांना देण्यात आले. गतवर्षी ऑगस्ट २०२० मध्येही जिल्हा प्रशासनाने सरकारी व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना दिले होतेे. यातील काही व्हेंटिलेटर अद्यापही काही खासगी रुग्णालयांकडेच आहेत. सरकारी व्हेंटिलेटर ज्या रुग्णांना लावले जातील, त्यांच्याकडून व्हेंटिलेटरचे पैसे आकारण्यात येणार नाहीत, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. पैसे आकारल्यास व्हेंटिलेटर परत घेतले जातील, असेही सांगण्यात आले. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ऑडिटर नेमण्यात आले. परंतु प्रत्यक्षात तसे काहीही होत नसल्याची स्थिती आहे. कारण त्यानंतरही व्हेंटिलेटरपोटी हजारो रुपये रुग्णांकडून आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. त्यामुळेे सरकारी व्हेंटिलेटरद्वारे खासगी रुग्णालयांत पैसे कमाविण्याचा उद्योग होत असल्याचे दिसते.