औरंगाबाद : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ६० वर्षांत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पहिली पसंती व्यवसाय, उद्योग, शासकीय नोकरी आणि खाजगी कंपन्यांना दिली आहे. राजकारणात अपवादाने विद्यार्थी गेले आहेत.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणी
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन राजकारणात नशीब आजमावलेले माजी मंत्री कमलकिशोर कदम, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार श्रीकांत जोशी, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जिवनराव गोरे, औरंगाबाद भाजपचे माजी अध्यक्ष बसवराज मंगरुळे, उस्माबानाद भाजपचे अध्यक्ष नितीन काळे, औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे, पुण्यातील मनोज गायकवाड हीच नावे समोर येतात. यातील कमलकिशोर कदम यांनी सुरुवातीच्या काळात शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. त्यानंतर राजकारणात विशिष्ट परिस्थिती, आग्रहामुळे राजकारणात पाऊल टाकले आहे. हीच परिस्थिती आ. सतीश चव्हाण यांची आहे.
१९६० साली ८३ विद्यार्थ्यांनी सुरुवात; आतापर्यंत घडविले उच्च दर्जाचे १६ हजार अभियंते
विद्यार्थ्यांनी व्यवसाय, उद्योगाची मुहूर्तमेढ रोवलीशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी स्वत:चे उद्योग विकसित केले. त्यातून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची किमयाही साधली आहे. वडिलोपार्जित असलेल्या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तारही करण्यात आला. यामध्ये राम भोगले, आ. सतीश चव्हाण, प्रशांत देशपांडे, सुनील रायठठ्ठा, अशोक थोरात, डी.बी. सोनी, प्रसाद कोकीळ, उमेश दाशरथे, शिवप्रसाद जाजू, देवानंद कोटगिरी, अजित सौदलगीकर, पापालाल गोयल, मनीष रावके, रवींद्र वैद्य, सुधीर शिरडकर, मुकुंद कुलकर्णी, प्रमोद खैरनार आदींचा समावेश असल्याचेही विवेक भोसले यांनी सांगितले.
अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलेशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात १९६१ साली प्रवेश घेतला. मात्र, आर्थिक हलाखीच्या परिस्थितीमुळे पहिल्या वर्षी शिक्षण घेऊ शकलो नाही. तेव्हा महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन पुरुषोत्तम नगरकर यांना परिस्थिती सांगितली. तेव्हा त्यांनी तात्काळ मदत देण्याचे मान्य केले. एवढेच नव्हे तर घरात ठेवून घेतले. त्यामुळेच अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ शकलो. आम्हा विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत जावे लागत होते. औरंगाबादेत लॅब नव्हती. १९६५ साली अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच वर्षी प्राध्यापक म्हणून याच महाविद्यालयात रुजू झालो. त्याठिकाणीच ज्ञानदानाचे काम केले. हे काम १९८३ पर्यंत सुरू होते. मराठवाड्यात तांत्रिक विद्यालय नव्हते. त्यामुळे सुरुवातीला तांत्रिक विद्यालय सुरू केले. हे मराठवाड्यातील पहिले तांत्रिक विद्यालय होते. पुढे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी खाजगी संस्थांना अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यासाठी मान्यता दिली. तेव्हा १९८३ साली एमआयटी पॉलिटेक्निक महाविद्यालयाची आणि पुढच्याच वर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाला सुरुवात केली. -डॉ. यज्ञवीर कवडे, अध्यक्ष, एमआयटी शिक्षण संस्था
कॉलेजचा आधारशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील, अतिशय गरीब कुटुंबातील होते. या महाविद्यालयाने सर्वांना आधार दिला. आम्ही हॉस्टेलला राहत असताना अनेकांकडे पैसे नसत, तरीही एकमेकांच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयाची वार्षिक फीस केवळ ३८० रुपये होती. १९९१ साली इलेक्ट्रिकल शाखेतून पासआऊट झालो. तोही विद्यापीठाचा गोल्डमेडलिस्ट विद्यार्थी म्हणून. हा आनंदाचा क्षण होता. कोणी काहीही म्हणो गुणवत्ता असेल तर कोणालाही कोणी डावलू शकत नाही. हेच महाविद्यालयाने आम्हाला शिकविले.- नासीर कादरी, मुख्य अभियंता, महापारेषण, नवी मुंबई
अभियांत्रिकी महाविद्यालयाने घडविलेशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९७१ साली पासआऊट झालो. आमच्या बॅचमधील प्रत्येकाने उत्तुंग यश मिळविले. विविध क्षेत्रात नाव कमावले. १९७१ साली रोजगार मिळणे कठीण झाले होते. मंदी मोठ्या प्रमाणात होती. नोकरीसाठी मुंबई, पुण्यालाच जावे लागत होते. तेव्हा त्याठिकाणी मराठवाडा विद्यापीठाचे नावही माहीत नसे. शेवटी पत्ते बदलून विद्यार्थ्यांनी नोकऱ्या मिळविल्या. या नोकरी करताना स्वत:ला सिद्ध केले. मलाही गरवारे कंपनीत मुंबईला नोकरी मिळाली. पुढे औरंगाबादेत आल्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊनच गरवारे कंपनीचे विविध प्रकल्प उभारले. औरंगाबादच्या विकास महाविद्यालयाचे मोठे योगदान आहे. - अनिल भालेराव, अध्यक्ष, हेडगेवार रुग्णालय ट्रस्ट
प्राध्यापकांमुळेच घडलो शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल अभ्यासक्रम १९९४ साली पूर्ण केला. या काळात महाविद्यालयात प्राध्यापकांनी दिलेले प्रेम अविस्मरणीय असेच आहे. ते हाडाचे शिक्षक होते. महाविद्यालयात असताना विद्यार्थी परिषदेचा उपाध्यक्ष होतो. तेव्हा तांत्रिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या संख्येने आयोजित केले. तेव्हाच नेतृत्व विकसित झाले. महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे बघून वाटत होते की, आपणही प्राध्यापकच व्हावे. त्यासाठी बांधकाम विभागात लागलेली नोकरी सोडून प्राध्यापकीच्या पेशात आलो. याचा माझ्या प्राध्यापकांनाही विशेष आनंद होता.- डॉ. अभिजित वाडेकर, प्राचार्य, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय
मराठवाड्यातील विद्यार्थी ठरले अव्वलशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली. त्याचवर्षी सिव्हिल विभागात प्रवेश घेतला. तेव्हा २३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. त्यातील केवळ ८ विद्यार्थी मराठवाड्यातील होते. त्यामध्ये माझ्यासह प्रमोद विटकर, कुलदीपसिंग छाबडा, खडकीकर, वळसकर आदींचा समावेश होता. इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आम्ही मागास असल्याचे वाटायचे. मात्र, आम्ही त्यांना कधीही पुढे जाऊ दिले नाही. पहिल्या बॅचच्या मराठवाड्यातील आठही विद्यार्थ्यांनी नाव कमावले, याचा अभिमान वाटतो. मराठवाड्याच्या विकासात काही योगदान देता आले. याबद्दल आम्ही कायम या महाविद्यालयाचे ऋणी राहू इच्छितो. - मेजर सुभाष संचेती, माजी विद्यार्थी
कॉलेजमुळे जग पाहायला मिळालेशासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर पहिल्यांदाच बाहेरचे जग पाहायला मिळाले. १९८६ ला मी बी.ई. मेकॅनिकल पदवी घेऊन बाहेर पडलो. बुद्धिवान आणि हुशार शिक्षकांचा सहवास लाभला. त्यावेळी शिक्षकांचे एक नाव असायचे. शैक्षणिक स्पर्धा आमच्या वेळी होती. कॉलेजमधून विद्यापीठापर्यंत पायी जावे लागत असे. कॉलेजातील वसतिगृहातच राहून शिक्षण पूर्ण केले. घरातून पहिल्यांदाच बाहेर पडलो होतो. घरून जी रक्कम यायची, त्यातील अर्धी रक्कम बचत करायचो. त्यातून पैठणगेट येथे रशियन साहित्यिकांची पुस्तके घ्यायचो. घरची आठवण यायची, पण वाचनात मन रमवायचो. गुलमंडीत एका ठिकाणी खानावळ लावली होती, तेथे एक वृद्ध नेहमी येत असत, ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर खूप सांगत असत. कॉलेजमधील सुंदर दिवस होते ते, जग कळण्याचे दिवस होते ते. - सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त औरंगाबाद विभाग
संस्कारांची शिदोरी तेथेच मिळाली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्कारांची शिदोरी मिळाली. शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन करून शिकविले. त्यांनी दिलेल्या ज्ञानशिदोरीमुळे येथपर्यंत पोहोचलो. अभिमान वाटतो, या कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्याचा. १९८९ ला बी.ई. सिव्हिलसाठी प्रवेश मिळाला. १९९३ ला तेथून बाहेर पडल्यानंतर आजपर्यंत बेरोजगार राहण्याची संधी मिळाली नाही. नोकरी लागल्यामुळे एम.ई.मध्ये घर सोडावे लागले. घराची जबाबदारीपण होतीच. वसतिगृहात राहूनच पदवी पूर्ण केली. कमीत कमी खर्चात शिक्षणाची संधी मिळाली. घरून ४०० रुपयांपर्यंत रक्कम येत असे. त्यात महिना जायचा. कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह (सीआर) होण्याची संधी मिळाल्याने नेतृत्वगुणाला चालना मिळाली. आठवणीतले आणि रम्य असे कॉलेजमधील ते दिवस होते. - अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता, पंतप्रधान ग्रामसडक योजना, पुणे
पाया मजबूत केल्यामुळे इमारत पक्की बनलीशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना शिक्षकांनी नैतिकतेबरोबरच आधुनिक शिक्षण दिले. तेव्हा शिक्षक अतिशय विद्वान होते. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर माझ्या व्यवसायाची, माझी इमारत उभी राहिली. पाया मजबूत केल्यामुळेच इमारत पक्की बनली. महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे नियोजन माझ्याच अध्यक्षतेखाली झाले होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. हे बदल नावीन्यपूर्ण आहेत. त्यात माजी विद्यार्थी मदत करत आहेत.- त्रिलोकसिंग जबिंदा, विकासक
महाविद्यालयानेच घडविलेमी १९८९ च्या मेकॅनिकल बॅचचा विद्यार्थी आहे. मात्र, त्यापूर्वीही महाविद्यालयासोबत माझे संबंध होते. याच महाविद्यालयात वडील प्राध्यापक होते. मुलांच्या वसतिगृहाचे वार्डनही होते. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वीच येणे-जाणे होते. महाविद्यालयात मिळालेल्या शिक्षण, संस्कारामुळे आज अमेरिकेसारख्या देशात उच्चपदस्थ म्हणून काम करतो आहे. आमच्या बॅचतर्फे निरोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्वांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. तेव्हा सर्व जण भारावून गेले होेते. तेव्हाचे महाविद्यालय आणि आताचे महाविद्यालय यामध्ये मोठा बदल झाला आहे. आता प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांना उपलब्ध असते. संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. देश-विदेशात उड्डाण घेण्यासाठी प्रवेश घेतल्यापासूनच विद्यार्थ्यांना माहिती असते. माझे औरंगाबादेतच शिक्षण झाले. माझ्या मुलांचे शिक्षण अमेरिकेत होत आहे. दोन्ही देशांतील शिक्षणात खूप फरक आहे. आता आपण तिकडच्या शिक्षणाचा अभ्यास करू लागलो आहोत. - धनंजय देशमुख, ग्लोबल सेल्स हेड, टॉप कोडर कंपनी, डेट्राईट, अमेरिका