मागील पाच वर्षांत : २००१ विद्यार्थ्यांनी घेतली पीएच.डी., तर १९५५ जणांनी एम.फिल्.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अलीकडच्या पाच वर्षांमध्ये २००१ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी घेतली, तर १९५५ विद्यार्थी एम.फिल्. झाले आहेत. दोन्हीचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. पीएच.डी. आणि एम.फिल्.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल वाढलेला असला तरी, मूलभूत संशोधन व उपयोजित संशोधनाकडे मात्र विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष झालेले दिसते.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुढील वर्षांपासून एम.फिल्. हा संशोधन अभ्यासक्रम बंद होणार आहे. काही विद्यार्थ्यांचा अपवाद सोडला, तर बहुतांशी विद्यार्थ्यांचा कल हा विविध फेलोशिप मिळविण्यासाठी एम.फिल्. करण्याकडे आहे. मागील २०१६-१७, १७-१८, १८-१९, १९-२० आणि २०-२१ या पाच वर्षांत प्रामुख्याने इंग्रजी विषयात १०८, मराठी- ११२, संगणकशास्त्र- ११३, वाणिज्य- ११२, अर्थशास्त्र- १०७, हिंदी- १०६, व्यवस्थापनशास्त्र- १०९, पाली अँड बुद्धिझम व राज्यशास्त्र या विषयांत प्रत्येकी १०८, तसेच उर्वरित विषयांत कमी-अधिक प्रमाणात विद्यार्थ्यांनी एम.फिल्. पदवी मिळवली.
दुसरीकडे, या पाच वर्षांत इंग्रजी विषयात १५३, मराठी- १२४, व्यवस्थापन शास्त्र- १३३, वाणिज्य- १२३, रसायनशास्त्र- १२०, राज्यशास्त्र- ५७ आणि भौतिकशास्त्र- ९२ , याव्यतिरिक्त अन्य विषयांत २००१ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली आहे.
तथापि, पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी या पाच वर्षांत २ हजार ५५ विद्यार्थ्यांनी अंतिम शोधप्रबंध सादर केले होते. यापैकी २००१ विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा (व्हायवा) यशस्वी झाली व त्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. उर्वरित ५४ विद्यार्थ्यांपैकी काहींनी दुसऱ्याचा थोडाफार बदल करून (कॉपी पेस्ट) शोधप्रबंध सादर केला होता. काहीजणांचे पुरेसे रेफरन्सेस नव्हते, तर काही जणांनी ओढूनताणून शोधप्रबंध तयार केलेले होते. बहिस्थ परीक्षकांनी ते दुरुस्त करून पुन्हा सादर करण्यासाठी परत दिले. काहीजणांचा व्हायवा चांगला झाला; पण प्रबंध परिपूर्ण नव्हते.
चौकट.....
काय आहेत अडचणी...
मार्गदर्शकांकडून चांगले मार्गदर्शन मिळते; पण विद्यापीठ आणि संशोधन केंद्रामध्येही आवश्यक पुस्तके नाहीत. अनेकवेळा अवलोकनार्थ संबंधित शोधप्रबंध मागितले, तर मिळत नाहीत. त्यामुळे संशोधन कार्यास उशीर होत आहे.
- संशोधक विद्यार्थी
मार्गदर्शकांकडून अडवणूक होते
आपल्याकडे बहुसंख्येने चांगले मार्गदर्शक आहेत. मात्र, थोड्या प्रमाणात असलेल्या व्यावसायिक मार्गदर्शकांकडून पैशाची मागणी केली जाते. आम्हाला फेलोशीप मिळते, त्यातील टक्केवारीची मागणी केली जाते. ती दिली नाही, तर सातत्याने प्रबंध पुनर्लेखनाचा आग्रह धरतात. त्यामुळे विलंब होत आहे.
- संशोधक विद्यार्थी.
गुणवत्तेचे संशोधन होणे अपेक्षित आहे
संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, गुणवत्तेचे संशोधन होताना दिसत नाही. त्यासाठी आपल्याकडील विद्यार्थ्यांचे दर्जेदार संशोधन झाले पाहिजे, यासाठी मार्गदर्शकांनीही प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याकडे चार-दोन सोडले, तर सर्वच मार्गदर्शक चांगले आहेत. आपल्या विद्यापीठातील ग्रंथालय देशातील पहिल्या दहामध्ये आठव्या क्रमांकाचे आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन रेफरन्सेस शोधण्याची गरज आहे.
- डॉ. राजेश करपे, सदस्य, व्यवस्थापन परिषद.
कालमर्यादेकडे दुर्लक्ष
पीएच.डी.साठी नियमित विद्यार्थ्यांसाठी ३ वर्षे, तर बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी ५ वर्षांची कालमर्यादा आहे; पण अनेकवेळा याकडे दुर्लक्ष केले जाते. वेळेत प्रबंध सादर केले जात नाहीत. दुरुस्तीसाठी प्रबंध परत दिला, तर तो त्रुटी दूर करून वेळेत सादर केला जात नाही. त्यामुळे मार्गदर्शकांकडे पीएच.डी.च्या जागा अडून पडतात.