लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभाग आणि संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेशांचा गोंधळ स्पॉट अडमिशनच्या शेवटच्या दिवशीही कायम होता. बुधवारी सायंकाळी ६ वाजता पदव्युत्तरच्या २० टक्के जागा वाढविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तासाभरातच रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर सतत नियमांमध्ये बदल करण्यात येत आहेत. प्रवेश फेºयांना सुरुवात झाल्यापासून प्रत्येक दिवशी प्रवेशाविषयी नवीन निर्णय होत आहे. हा सिलसिला अगदी स्पॉट अॅडमिशनच्या शेवटच्या दिवशीही कायम राहिला. बुधवारी सायंकाळी विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या सहीने विद्यापीठ विभाग आणि उपपरिसरातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सरासरी २० टक्के जागा वाढविण्यात येत आहेत. त्या जागा गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्पॉट अॅडमिशनमध्ये भरण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले. या आदेशानंतर तासाभरात सर्व विभागप्रमुखांना एसएमएसद्वारे संदेश पाठवत जागावाढीचे काढण्यात आलेले पत्र पुढील आदेश येईपर्यंत रद्द केल्याचे सांगण्यात आले. यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय आला. याविषयी विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
वाढविलेल्या जागा तासातच रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:07 AM