लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रेल्वे प्रशासनाने ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने रेल्वेस्टेशनच्या पाहणीच्या नावाखाली विशेष बोगीने प्रवास करून होणारे देवदर्शन आणि पर्यटनास चाप बसणार आहे. विशेषत: गेल्या अनेक वर्षांपासून दौ-याच्या नावाखाली सुरू असलेली दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिका-यांची चंगळ बंद होणार आहे.रेल्वे अधिकारी जेव्हा प्रवास करतात तेव्हा त्यांचा राजेशाही थाट दिसतो. त्यांच्यासाठी रेल्वेला विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज असे सलून अथवा ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’ची बोगी जोडली जाते. परंतु अधिका-यांनी आता ही शानशोकी बंद करावी आणि रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री-टीयर बोगीतून प्रवास करून प्रवाशांमध्ये मिसळावे, अशी सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिका-यांचा औरंगाबादकडे ओढा अधिक आहे. परंतु सोयी-सुविधा देण्याकडे हा ओढा नाही. तर केवळ देवदर्शन आणि पर्यटनासाठी हा ओढा दिसतो. प्रत्येक महिन्याला किमान एका अधिका-याचा पाहणी दौरा निश्चित असतो. परंतु रेल्वेस्टेशनवर दाखल झाल्यानंतर अनेक अधिका-यांचे कोणालाही साधे दर्शन होत नाही. औरंगाबादला आल्यानंतर ते थेट देवदर्शन आणि पर्यटनासाठी रवाना होत असल्याचा अनुभव स्थानिक रेल्वे अधिका-यांना येतो.अधिका-यांचा पाहणी दौरा आणि देवदर्शन, पर्यटन हे जणू समीकरणच बनले आहे. नवनियुक्त महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी पहिल्याच वार्षिक निरीक्षणाचे निमित्त साधून २८ जानेवारीला शिर्डी आणि शनि शिंगणापूरला जाऊन देवदर्शन केले.विशेष म्हणून शिर्डी दर्शन केल्याची महाव्यवस्थापकांनी स्वत:च कबुली दिली होती. त्यांच्या कबुलीने रेल्वेतील दौºयांची परिस्थिती उघड झाली होती.
रेल्वे अधिका-यांची चंगळ होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 11:54 PM