- सुनील घोडके
खुलताबाद: बाजार सांवगी येथे दवाखान्यात जाणारे दोन युवक धांड नदीच्या पाण्याचा वेग अचानक वाढल्याने मोटारसायकलसह वाहून जात होते. दरम्यान, ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून अवघ्या काही अंतरावर वाहून जाणाऱ्या दोघांना नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. यावेळी बाइक पुरात वाहून गेली मात्र, दोघांचे प्राण वाचल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही घटना आज सकाळी संडेदहा वाजता घडली.
रविवारी रात्रीपासून खुलताबाद तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून नदीनाले दुथडीभरून वाहत आहेत. तालुक्यातील अनेक नद्यांना पुर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीच्या पाण्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील ममुराबाद येथील शहाबाज अजहर पटेल ( १८) , परवेझ मजहर पटेल ( १८ ) दोन्ही सख्खे चुलत भाऊ ममुराबाद येथून बाजार सांवगी येथे दवाखान्यात जात होते. यावेळी गावाजवळील धांड नदीला पावसामुळे पुर आला होता. चालकाला पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने बाइक तशीच पुढे नेली. मात्र, याचवेळी अचानक पाण्याचा वेग वाढल्याने बाइक पाण्याच्या वेगाने पुलावरून खाली जाऊ लागली. यामुळे दोघांनी खाली उतरत बाइक पाण्यात वाहून जावू नये म्हणून पकडून ठेवली. परंतु, पाण्याच्या जोरदार प्रवाहाने बाइकसह दोघे पुढे वाहत गेले.
हे दृश्य नदीच्या किनाऱ्यावरील ग्रामस्थांनी पाहिले. काहींनी तत्काळ पाण्यात उडी घेत घेत वाहून जाणाऱ्या दोघा मुलांना ५०० ते ६०० फुटाच्या अंतरावर नदीतून सुखरूप बाहेर काढले. मात्र बाइक नदीच्या पाण्यात वाहून गेली आहे. दोन्ही मुलांना किरकोळ मार लागला आहे. खुलताबाद तालुक्यात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.