जालना : साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडवा आहे. या दिवशी नवीन खरेदी शुभ मानली जाते. म्हणून बहुतांश खरेदी विक्री व्यवहार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केले जातात. मंगळवारी झालेल्या गुढीपाडव्याला खरेदीचा उत्साह बऱ्यापैकी दिसून आला. सराफा बाजारात उलाढाल मंदावली असून, वाहन, बांधकाम व इलेक्ट्रॉनिक्स बाजारात संमिश्र उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता घरोघर गुढीचे पारंपरिक उत्साहात पूजन करण्यात आले.त्यानंतन अनेकांनी नवीन वाहन, घर तसेच इतर खरेदी विक्रीचे व्यवहार पार पडले. येथील सराफा भारत जैन म्हणाले, गुढीपाडव्याच्या दिवशी उलाढाल मंदावली आहे. साधारणपणे चाळीस टक्के अथवा त्यापेक्षाही कमी व्यवसाय झाला. कारण मार्च महिन्यातच दोनदा गुरूपुष्यांमृत योग आले. त्यानंतर मार्चएंडलाच गुढी पाडवा आल्याने मोठा फरक पडला. अनेकजण ताळेबंद करण्यात व्यस्त आहेत. तसेच नोटाबंदीचा परिणाम अद्यापही कायम असल्याने खरेदी मंदावली आहे. शेतीकरी तसेच मजुरांचे पैसे बँकेत अडकल्याने परिणाम झाला आहे. बांधकाम व्यावसायिक धीरेंद्र मेहरा, श्याम सिरसाठ व राम मिसाळ म्हणाले, बांधकाम व्यवसायात संमिश्र उलाढाल झाली. अनेकांनी चौकशी केली. काहींना घरांची बुकिंग केली आहे. एकूणच बांधकाम स्थळांना भेटी व चौकशी वरून बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक सुदेश करवा, वासुदेव देवडे, जितेंद्र कवराणी, म्हणाले, गुढीपाडव्या दिवशी जालना बाजारपेठेत बऱ्यापैकी उलाढाल झाली. यात प्रामुख्याने फ्रिज, वॉशिंग मशीन, एलसीडी टीव्ही, एसींची अनेकांनी खरेदी केली. कर्जपुरवठ्याची सुविधा असल्याने मध्यमवर्गींयानाही पर्याय मिळाल्याचे इलेक्ट्रॉनिक्स दालनाच्या मालकांनी सांगितले. दुचाकी दालनाचे सचिन शाह म्हणाले, आमच्या दालनातून दोनशे दुचाकींची विक्री झाली. इतर दालनातही चांगली उलाढाल झाली.
गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह
By admin | Published: March 29, 2017 12:18 AM