लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची सांगता शनिवारी विजयादशमीने झाली़ यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ गाडीपुºयातील बालाजी मंदिराच्या रथ मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होवून गोविंदा़़़ गोविंदाचा गजर केला़विजयादशमीनिमित्त विविध संस्थानने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे़ बालाजी मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक रथाची मिरवणूक काढण्यात आली़ सायंकाळी रथाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला़ यावेळी भाविकांनी गोविंदा़़़ गोविंदा़़ग़ोविंदाचा जयघोष चालविला होता़ रथाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती़ बालाजी मंदिरात भाविकांच्या सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या़ त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते़ गोड फुटाणे, बताशे, गोड मुरमुरे, नारळ आदी प्रसादाची दुकाने थाटण्यात आली होती़दसºया निमित्ताने पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन करून प्रत्येकाने एकमेकांना आपट्याच्या रूपाने सोने देत शुभेच्छा दिल्या़ शहरातील वजिराबाद, श्रीनगर, तरोडानाका, शिवाजीनगर, वर्कशॉप, साठे चौक या बाजारपेठा पाना, फुलांनी सजल्या होत्या़ आपट्याची मागणी लक्षात घेवून व्यापाºयांनी प्रतिसोन्याचे भाव वाढविले़ ऊस, आंब्याची डहाळी, केळीचे खांब, तुरीचे पाने व आपट्याच्या पानांची जोडी दहा ते पंधरा रूपयास विकण्यात आली़ तर झेंडुची फुले ८० रूपये किलो दराने विकली़ नवामोंढा भागात रावण दहन करण्यात आले़ या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होती़
रथ मिरवणूक उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:24 AM