लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळख असणारी लावणी मराठी मनांना किती वेड लावू शकते आणि ढोलकीच्या तालावर ठेका धरायला कशी भाग पाडते, याचे उदाहरण सखी मंच आयोजित ‘एकापेक्षा एक अप्सरा’ लावणी कार्यक्रमात पाहायला मिळाले. लोकमत भवनमधील हिरवळीवर बुधवारी रंगलेला हा लावणी धमाका पाहून महिला भारावल्या अन् लावणीच्या तालावर मुक्तपणे थिरकल्याही.देशात सर्वत्र चंद्रग्रहण सुरू होते तर लोकमतच्या हिरवळीवर अवखळ लावणीमुळे सखींच्या उत्साहाचे चांदणे पसरलेले होते. सोनी मसाले हे या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सर्स होते. याप्रसंगी भाग्यश्री सोनी यांचा सत्कार करण्यात आला. कित्येक वर्षे महाराष्ट्रातील महिलांना लावणी ही कला अनुभवता, पाहता येत नव्हती. पण आपल्या सखींनाही या कलेचा निखळ आनंद घेता यावा, यासाठी सखी मंचने पुढाकार घेऊन मागील काही वर्षांपासून दरवर्षी लावणी कार्यक्रम आयोजित केला.प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला सखींचा वाढताच प्रतिसाद मिळत गेला. बुधवारी झालेल्या कार्यक्रमालाही सखींनी तुफान गर्दी केली होती.‘बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा..’ या गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर ‘कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी...’ ही गवळण सादर करून नृत्यांगनांनी श्रीकृष्णाची आठवण करून दिली. हळूहळू वातावरणातील गारवा वाढत गेला आणि लावणी अधिकाधिक रंजक बनत गेली.‘दिलबरा करते तुला मुजरा...’ ही लावणी सादर करण्यासाठी साधना पुणेकर यांनी रंगमंचावर प्रवेश करताच सखींनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली. ‘या रावजी, बसा भावजी...’ ही लोकप्रिय लावणी साधना यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत सादर करून सखींची मने जिंकली.‘ईचार काय हाय तुमचा..’ या लावणीला सुरुवात होताच अनेक सखींनी आपल्या जागा सोडल्या आणि थेट रंगमंच गाठला. रंगमंचावर अनेक सखींनी नृत्यांगनांसोबत थिरकण्याचा आनंद लुटला. सखींचा मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद नृत्यांगनांनाही नवा उत्साह देणारा ठरला. ‘कारभारी दमानं..’, ‘लाडाची गं लाडाची, कैरी पाडाची....’ अशा लोकप्रिय लावण्या सखींना तालावर थिरकण्यास भाग पाडत होत्या.निवेदक नवनाथ भोसले यांनीही ‘गं साजणी....’ यासारखी लोकप्रिय गाणी गाऊन सखींचे मनोरंजन केले. ‘सोडा सोडा राया हा नाद खुळा...’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल...’ यासारख्या लोकप्रिय लावण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली.
‘अप्सरा’सोबत थिरकल्या औरंगाबादच्या सखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:34 AM
महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळख असणारी लावणी मराठी मनांना किती वेड लावू शकते आणि ढोलकीच्या तालावर ठेका धरायला कशी भाग पाडते, याचे उदाहरण सखी मंच आयोजित ‘एकापेक्षा एक अप्सरा’ लावणी कार्यक्रमात पाहायला मिळाले. लोकमत भवनमधील हिरवळीवर बुधवारी रंगलेला हा लावणी धमाका पाहून महिला भारावल्या अन् लावणीच्या तालावर मुक्तपणे थिरकल्याही.
ठळक मुद्देएकापेक्षा एक अप्सरा : लावणी कार्यक्र माला महिलांची तुफान गर्दी; सखींच्या उत्साहाचे पसरले चांदणे