औरंगाबाद : दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याची जगभरात ख्याती आहे. याच किल्ल्यावर लेणीदेखील आहेत. मात्र, हे अनेक पर्यटकांना माहीत नाही. या लेणीच्या छताची काही ठिकाणी पडझड झाली आहे. त्यामुळे लेणीच्या संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाकडून सध्या हाती घेण्यात आले आहे. लवकरच लेणी इतिहासप्रेमी, पर्यटकांना पाहता येणार आहेत.
शेकडो वर्षांपासून देवगिरी किल्ल्यात दडलेली लेणी सापडली आहेत. किल्ल्यावरचा हा भाग सात टाकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. किल्ल्यावरील मेंढा तोफेच्या समोर रंगमहाल आहे. त्याच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर जंगलासारखी झुडपे वाढतात. शिवाय खोल खंदकही आहे. त्यामुळे हा रस्ता अनेक वर्षांपासून बंद होता. कोरोना प्रादुर्भावात पर्यटकांची वर्दळ नसल्याने पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक डाॅ. मिलनकुमार चावले यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्यावर साफसफाई मोहीम सुरू केली होती. तेव्हा या ठिकाणी लेणी असल्याचे समोर आले. पावसामुळे लेणीचे छत कोसळले होते. त्यामुळे प्रथम पडलेले ढिगारे काढण्यात आले. यापुढेही खडक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लेणीच्या छताला आधार देणारे खांब बांधण्याचे काम सुरू आहे.
पर्यटकांना भुरळसध्या पावसामुळे दौलताबाद किल्ल्याचा परिसर पर्यटकांना भुरळ घालत आहे. शनिवारी, रविवारी पर्यटकांची पावले या परिसराकडे वळत आहेत. किल्ल्याबरोबरच लवकरच लेणीही पाहण्याचा योग जुळून येणार आहे.