पाचोड : मनमाडहुन घनसावंगीकडे पेट्रोल व डिझेल घेऊन जाणारे टँकर धुळे-सोलापूर महामार्गावरील रोहिलागड फाट्याजवळ पहाटे ४ वाजता विद्युत खांबाला धडकून उलटले. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. विशेष म्हणजे इंधनाने भरलेल्या या टँकर ने विद्युत खांबाला धडक दिल्यानंतर त्यात विद्युत प्रवाह होता. जर टँकरने पेट घेतला असता तर अवघा परिसर जळून खाक झाला असता. मात्र, पाचोड पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिसर निर्मुष्य करून वीज पूरवठा खंडीत केल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, घनसावंगी (जि.जालना) येथील सयाजीराव देशमुख यांचा घनसावंगी येथे पेट्रोल, डिझेप पंप आहे. बुधवारी टँकरचालक मनमाडहुन घनसावंगीकडे जात असताना पहाटे ४ वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रोहिलागट फाटा येथे टँकर (एम.एच-२६.एच-६९११) उलटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला धडकले. टँकर विद्युत खांबाला धडकले तेव्हा त्यात ६ हजार लिटर पेट्रोल तर ६ हजार लिटर डिझेल होते. सुदैवाने विद्युत प्रवाह सुरु असलेल्या या खांबाला टँकर धडकल्यानंतर त्याने पेट घेतला नाही. नसता रोहिलागट फाटा परिसर, रोहिला गड, दाभरूळ, थापटी तांड आदी गाव परिसरात मोठी हानी झाली असती.
दरम्यान, रोहिलागड फाट्यावर पेट्रोल घेऊन जाणारे टँकर उलटल्याची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि. महेश आंधळे, पोउनि. गोरक्ष खरड, पोलिस जमादार फोलाने, बनगे, काकडे, कल्याण राठोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसर निर्मुष्य केला तसेच मार्गावरील वाहतूक थांबवून महाविरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर विद्युत खांबावरील वीजपूरठा खंडीत केला. यामुळे पुढील अनर्थ टळला. यासोबतच पोलिसांनी भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग यांनीही सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली.