औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे औरंगाबादच्या उद्योगांची मागील चार महिन्यांपासून आर्थिक घडी विस्कटलेली आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात उद्योगांना विजेचा स्थिर आकार न लावण्याचे शासनाने आश्वासन दिले होते. मात्र, महावितरणने स्थिर आकार लावलेली मागील चार महिन्यांची बिले दिल्यामुळे उद्योजक हादरून गेले आहेत.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे २४ मार्चपासून लॉकडॉऊनची मालिका सुरू झाली. बहुतांश कामगार गावी गेले. देश-विदेशात लॉकडाऊनची परिस्थिती सारखीच असल्यामुळे ऑर्डर कमी झाल्या. अनेक उद्योगांचे आर्थिक गणित कोलमडले. अजूनही अनेक शहरांतील बाजारपेठा उघडल्या नसल्याने येथील उद्योगांची उत्पादन क्षमता अद्यापही ५० टक्क्यांच्या वर सरकलेली नाही. दुसरीकडे, एप्रिल, मे, जून, जुलै या चार महिन्यांत विजेच्या बिलात स्थिर आकार आकारला जाऊ नये, यासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाले होते.
मात्र, आता चार महिन्यांच्या बिलासोबत महावितरणने मोठ्या प्रमाणात स्थिर आकार आकारला आहे. मोठ्या उद्योगांना प्रतिमहिना पाच लाखांपर्यंत, तर लघु, सूक्ष्म उद्योगांना दरमहा कमीत कमी २५ हजार रुपये स्थिर आकार आकारण्यात आला. चार महिन्यांचा हा स्थिर आकार तीन टप्प्यांत विभागून भरण्याच्या सूचना महावितरणने दिल्या आहेत. सध्या उद्योगांची आर्थिक घडी रुळावर आलेली नाही आणि त्यात स्थिर आकाराचा भुर्दंड बसत असल्यामुळे उद्योजक हतबल झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळातील चार महिन्यांचा विजेचा स्थिर आकार रद्द करावा, या मागणीसाठी सर्व उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, तसेच ऊर्जामंत्र्यांना भेटणार आहे.
उद्योगांची आर्थिक स्थिती नाजूकयासंदर्भात ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटामुळे औरंगाबादचे अनेक उद्योग अखेरची घटिका मोजत आहेत. पुरेशा ऑर्डर नाहीत. कुशल कामगारांची टंचाई आहे. पूर्ण क्षमतेने बाजारपेठा सुरू नसल्यामुळे उत्पादनाला मागणी नाही. त्यामुळे उद्योगांची उत्पादन क्षमताही अर्ध्यावर आली आहे. उद्योगांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. या परिस्थितीत उद्योग बंद असलेल्या लॉकडाऊनच्या काळात उद्योगांना विजेचा स्थिर आकार लावू नये, या मागणीसंदर्भात सर्व उद्योग संटनांचे शिष्टमंडळ मंत्रिमहोदयांना या आठवड्यात भेटणार आहे.