वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात उद्योजकांनी शनिवारी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडत विविध प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. प्रशासनाकडून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन उद्योजकांना देण्यात आले.
वाळूज एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते, सांडपाणी, पार्किंग समस्या, घन कचरा व्यवस्थापन आदी प्रश्नांकडे एमआयडीसी प्रशासन कानाडोळा करीत असल्यामुळे उद्योजकांना विविध आडचणींचा सामना करावा लागतो. औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वाळूजच्या मसिआ सभागृहात नुकतीच एमआयडीसी वरिष्ठ अधिकारी व मसिआ पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मसिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ, उपाध्यक्ष नारायण पवार, सचिव राहुल मोगले, विकास पाटील अशोक काळे तर एमआयडीसीचे मुख्य अभियंता शिवहरी दराडे, कार्यकारी अभियंता भुषण हर्षे आदींची प्रमूख उपस्थिती होती.
या बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील विविध सेक्टरमध्ये पडलेले मोठमोठाले खड्डे, नादूरुस्त अंतर्गत रस्ते, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटार तयार करणे, नाले सफाई, पार्किंग समस्या, कामगार चौक ते एफडीसी कंपनी, जॉन्सन अॅड जॉन्सन ते काॅस्मो फिल्म, एम सेक्टर ते रांजणगाव या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करणे, घन कचरा व्यवस्थापन, खाजगी गट नंबर मधील उद्योजकांना पाणी पुरवठा करणे, औद्योगिक क्षेत्रातील प्रमूख चौकात सुलभ शौचालय व बस थांबे उभारणे आदी समस्या उद्योजकांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. या समस्या संदर्भात सतत पाठपुरावा करुनही प्रश्न निकाली काढले जात नसल्यामुळे उद्योजकांनी आपल्या व्यथा मांडत नाराजी व्यक्त केली.
या बैठकीला अर्जुन गायकवाड, अजय गांधी, सुमित मालाणी, सचिन गायके, एमआयडीसीचे सहायक अभियंता अरुण पवार, सुधीर सुत्रावे, गणेश मुळीकर आदींसह मसिआच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या बैठकीत मुख्य अभियंता शिवहरी दराडे व कार्यकारी अभियंता भुषण हर्षे यांनी अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी निविदा व वर्क ऑर्डरची प्रकिया सुरु असल्याचे सांगत या महिन्या अखेर रस्त्याचे काम पुर्ण होणार असल्याचे सांगितले.