छत्रपती संभाजीनगर : पंधरा दिवसांपुर्वी हनुमानगन मध्ये घर फोडून ७० तोळे सोने चोरुन नेल्याची घटना ताजी असतानाच उच्चभ्रु वसाहतीमध्ये चोरांनी त्याचा विक्रम मोडला आहे. एन- १ परिसरात राहणाऱ्या उद्योजकाच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत चोरांनी तब्बल १०६ तोळे सोने लंपास केले. शनिवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली.
मेडिकल सर्जिकलचा व्यवसाय करणारे निखिल मुथा एन-१ मधील गरवारे मैदानाजवळ राहतात. शनिवारी रात्री ८ वाजता तेथे प्रोझोन मॉल येथे खरेदीसाठी कुटुंबासह गेले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास घरी परतल्यावर मुख्य दरवाजा उघडून ते घरात गेले. मात्र, घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी घराची पाहणी केली. त्यात एका खोलीच्या खिडकीचे गज कापून खिडकीची जाळीच काढली असल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ पोलिसांना संपर्क केला.
१०६ तोळे सोने, मोबाईलही नाही सोडलाचोरांनी घरात प्रवेश करुन तिजोरीच फोडली. पत्नी, आईसह निखिल यांचे जवळपास १०६ तोळे सोन्याचे दागिने ज्यामध्ये ब्रेसलेट, बांगड्या, अंगठ्या, पेडल, मोत्यांचा सेट, हिऱ्यांचे दागिने वेढे, १९० ग्रॅम चांदी, २४ हजार रोख रक्कम व २५ हजार रुपयांचा मोबाईल लंपास केला.
घरफोड्या थांबेनागेल्या सहा महिन्यांपासून शहरात सातत्याने घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. सातारा, नक्षत्रवाडी, सिडको, वाळुज, एमआयडिसी वाळुज, पुंडलिकनगर मध्ये मोठ्या प्रमाणावर चोर घरांना लक्ष करत आहेत. यामुळे पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.