औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पाठविलेल्या ‘इक्विसा’ प्रकल्पास ग्रीसमधील पोलेपोन्से विद्यापीठाने मंजुरी दिली आहे. याअंतर्गत पाच वर्षे विद्यार्थी, संशोधक व शिक्षकांना विदेशात संशोधनासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे, अशी माहिती ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल’चे संचालक डॉ. यशवंत खिल्लारे यांनी दिली.या संशोधन केंद्राने जगातील अनेक नामांकित विद्यापीठे व संस्थांच्या माध्यमातून संशोधन प्रस्ताव फेलोशिप मिळवून दिल्या आहेत. यासंदर्भात ग्रीस या देशातील पेलेपोन्से विद्यापीठाकडे संशोधन व विस्तार कार्य यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या विद्यापीठाने ‘इक्विसा कपॅसिटी बिल्डिंग इन हायर एज्युकेशन’ या योजनेंतर्गत प्रस्ताव मंजूर केला आहे. यासंदर्भात या विद्यापीठातील शैक्षणिक व समाजकार्य विभागाचे प्रा. योऊली पापाडीमंटकी यांनी प्रस्ताव मंजूर केल्याचे कळविले आहे. सप्टेंबर २०१७ ते २०२२ असा पाच वर्षांसाठी ७ लाख ३५ युरो इतका (सुमारे साडेपाच कोटी रुपये) निधी देण्यात येणार आहे. याअंतर्गत उभय विद्यापीठामध्ये संशोधन कार्य राबविण्यात येणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेतील पदव्युत्तर विद्यार्थी, पीएच.डी. संशोधक व प्राध्यापकांना ग्रीसमधील विद्यापीठात जाण्याची संधी मिळणार आहे. या दोन्ही विद्यापीठात लवकरच बैठक होऊन सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात येईल.
‘इक्विसा’ प्रकल्प मंजूर
By admin | Published: September 10, 2016 12:20 AM