औरंगाबाद : महासत्तेपेक्षा देशात समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, तरच पुरोगामी प्रगत विचारांच्या महापुरुषांना खरेखुरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती उत्सव समारंभात ते बोलत होते. यावेळी भारतीय विधि आयोगाचे माजी सदस्य प्रा. डी. एन. संदानशिव, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी संयोजक डॉ. सुहास मोराळे, डॉ. उत्तम अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाट्यगृहात मंगळवारी (दि.१२) हा कार्यक्रम झाला. यावेळी शाहू महाराज म्हणाले, भारताचा पाच हजार वर्षांचा इतिहास मांडण्यात आलेला आहे. १८ व्या शतकापर्यंत सामाजिक इतिहास सांगितला गेला नाही. प्रा. संदानशिव यांचे ‘राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झाले. समता, बंधुता व न्याय ही त्रिसूत्री भारतीय राज्यघटनेमुळे मिळाली. या वैचारिक मूल्यांची बीजे फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीत आहेत. भारतात आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारा पहिला राजा म्हणून सयाजीराव गायकवाड यांची नोंद आहे. या राजाचा इतिहास जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवण्यात आला, असे बाबा भांड म्हणाले. दरवर्षी फुले-आंबेडकर जयंती महोत्सव घेण्यात येईल, असे डॉ.चोपडे यांनी घोषित केले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन, डॉ. उत्तम अंभोरे यांनी आभार मानले. नलिनी चोपडे, डॉ. राजेश करपे, डॉ. सर्जेराव ठोंबरे, भन्ते आनंदजी, डॉ. अरुण खरात, डॉ. धनंजय माने, डॉ. कैलास पाथ्रीकर यांची उपस्थिती होती.
महासत्तेपेक्षाही समतेची गरज
By admin | Published: April 13, 2016 12:26 AM