औरंगाबाद : औरंगाबादेतील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वॉक इन कोल्ड स्टोअरेज अखेर कार्यान्वित झाले आहे. हे कोल्ड स्टोअर केवळ कोरोना प्रतिबंधात्मक लसी साठविण्यासाठी वापरण्यात येणार असून, येथून औरंगाबादसह मराठवाड्यात लसींचा पुरवठा होणार आहे.
देशभरासह जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरात आजघडीला सिडकोतील कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात कोल्ड स्टोअरेज आहे. गेले काही दिवस या ठिकाणी प्राप्त लसी ठेवण्यात आल्या आणि येथूनच सर्वत्र वितरित करण्यात आल्या. कोरोनाच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मार्चमध्ये त्यास सुरुवात होणार आहे. तेव्हा अधिक प्रमाणात लसींची साठवणूक आणि वितरण करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर छावणी आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयात कोल्ड स्टोअर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
१६ क्यूबिक मीटर क्षमता
आरोग्य उपसंचालक कार्यालयातील तळमजल्यावर हे १६ क्युबिक मीटर क्षमतेचे कोल्ड स्टोअर तयार करण्यात आले आहे. सिडकोतील कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात वॉक इन फ्रिजर आणि वॉक इन कुलर आहे. दोन्हींची क्षमता प्रत्येकी १२ क्युबिक मीटर क्षमता आहे.
फक्त कोरोना लसींची साठवणूक
कार्यालयात तयार करण्यात आलेल्या कोल्ड स्टोअरमध्ये केवळ कोरोना प्रतिबंधात्मक लसीच ठेवण्यात येणार आहे. स्टोअरची थंड होण्याची चाचणी झाली आहे. नवा साठा आल्यानंतर या ठिकाणी लसी ठेवल्या जातील.
- डॉ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक
फोटो ओळ...
आरोग्य उपसंचालक कार्यालयात तयार करण्यात आलेले कोल्ड स्टोअर.