--
सर्वच अवयवांचे रिट्रायव्हल सेंटर शहरात असून, प्रत्यारोपणाच्या सर्वच शस्त्रक्रिया इथे होत आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वीपर्यंत कर्करोगाच्या काही शस्त्रक्रियांसाठी मुंबई वा पुणे गाठावे लागायचे. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांत आरोग्याच्या पायाभूत सुविधांची झालेली उपलब्धता तर सुपरस्पेशालिटी उपचारांची उपलब्धता जगभरातून मेडिकल टुरिझमला खुणावू लागली आहे. उपचारासाठी मराठवाड्यासह विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातून औरंगाबादला प्राधान्यक्रम मिळताना दिसतोय. त्यातच औरंगाबाद आरोग्य सुविधांत क्रमांक एकचे शहर म्हणूनही गाैरवले गेल्याने इथल्या उपलब्ध अत्याधुनिक आरोग्य सुविधाही त्याला कारणीभूत आहेत.
धर्मदायी रुग्णालये, खासगी रुग्णालयांसह येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय राज्यातील शासकीय रुग्णालयातील सर्वात मोठी आरोग्य संस्था म्हणून बहरते आहे. सुपरस्पेशालिटी ब्लाॅक, त्यात उपलब्ध अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, वर्षाकाठी सात ते आठ लाख रुग्णांना सेवा देते. खासकरून येथील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रीया, औषधोपचाराने दिलेले जीवदान या संस्थेवरचा विश्वास दिवसेंदिवस द्विगुणित करत आहे. कोरोनाच्या महामारीतही घाटीने आसपासच्या जिल्ह्यांच्या रुग्णांना आधार देत उपचार दिला. अडीच ते तीन हजार खाटांची टर्शरी केअरची सुविधा असलेल्या औरंगाबाद शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आरोग्य सुविधेतील वाढीमुळे आता दहा हजारांपर्यंत रुग्ण उपचार एकाच वेळी करता येतील, एवढी मोठी व्यवस्था मुंबई, पुण्यानंतर मराठवाड्यातील इतर शहरांपेक्षा मोठी उपलब्धी बनली आहे.
शासकीय कर्करोग रुग्णालयातील कर्करोगाच्या संबंधीचे बहुतांश उपचार उपलब्ध झाले आहेत. शस्त्रक्रियांच्या वेटिंग वाढल्यावर मुंबईहून इथे रुग्ण रेफर होत आहेत, तर येथील किरणोपचाराचे विस्तारीकरण हे आणि राज्य कर्करोग संस्था म्हणून संशोधन व वैद्यकीय शिक्षणातील वाटचाल मनुष्यबळ उपलब्धतेला पुरक बनली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय कंपन्यांच्या चेन आणि मोठ्या वैद्यकीय संस्थांची वाढ ही औरंगाबादच्या वैद्यकीय उपचारात भर घालणारी आहेत. न्युक्लिअर मेडीसीन, पेट स्कॅन, पोटाच्या सर्व विकारांचे एका छताखाली उपचार, दात व मुख आरोग्य संदर्भातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, रक्तविकारातील सर्व प्रकारच्या तपासण्या, उपचारासाठी तज्ज्ञांची उपलब्धता आणि त्यांनी औरंगाबादला दिलेले प्राधान्य येथील आरोग्य क्षेत्रातील पोटॅन्शियल दर्शवते.
मूत्रपिंडविकार, मूत्रविकार, मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, आयव्हीएफ तंत्रज्ञान, हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया, अत्याधुनिक उपचारासाठी खासकरून लोक शहराला पसंती देताना अस्थिव्यंग उपचार, रिहॅबिलिटेशन, मनोविकारासाठीचे तज्ज्ञांकडे राज्यभरातील रुग्णांची रिघ बघायला मिळते. शिवाय देशविदेशातूनही या उपचारासाठी रुग्ण औरंगाबाद गाठतात. ही येथील अत्याधुनिक उपचाराच्या सुविधांच्या उपलब्धतेची पावती आहे. सिटीस्कॅन, एमआरआय, व्हिआरडीएल लॅब या सुविधा शासकीय रुग्णालयांत उपलब्ध झाल्याने गोरगरीब रुग्णांनाही सवलतीच्या दरात उपचार शक्य झाले. याशिवाय येथील मोठ्या व धर्मदायी रुग्णालयांकडून एक एक सुविधा वाढवण्यात केलेली स्पर्धा औरंगाबाद शहराची वैद्यकीय क्षेत्राची श्रीमंती वाढवणारे आहे.
मुंबई, पुण्याच्या डाॅक्टरांनी दिलेला सल्ल्याला सेकंड ओपीनियनसाठी येथील तज्ज्ञांचा जसा दबदबा आहे. तसेच महिला वर्गातून प्रसुतीसाठी औरंगाबादला खास पसंती दिल्याचे पाहायला मिळते. ते येथील तज्ज्ञ डाॅक्टरांवरच्या विश्वासाचे द्योतकच मानावे लागेल. एकंदरीत औरंगाबाद कोरोना महामारीच्या संकटातही वैद्यकीय क्षेत्रात मोठी झेप घेत असून, घाटी जिल्हा रुग्णालयासह येथील धर्मदायी, खासगी रुग्णालयांतील वाढत्या सुविधा आरोग्य सुविधा, उपचारासाठी शेजारील जिल्ह्यांसह इतर देशांतील रुग्णांनाही खुणावत आहेत. ते शहराच्या व येथील आरोग्याच्या अत्याधुनिक सोयी सुविधांच्या पायाभरणीला कारणीभूत ठरतेय.