बनकिन्होळा : सातबारावर पिकाची नोंदणी तलाठ्याकडून करण्यात येत होती. मात्र, आता महसूल विभागाने डिजिटल तंत्राद्वारे नवे ई- पीक पाहणी ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्याला स्वतःचे पिकाची नोंदणी स्वतः करता येऊ लागली आहे; परंतु ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या निर्माण होत असल्याने ऑनलाईन पीक पेरा नोंदवायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
सध्या सर्वत्र पीकपेरा ही मोहीम जोरात राबविली जात आहे. शासनस्तरावर महसूल विभागातले कर्मचारी कृषी विभाग कर्मचारी अधिकारी हे ॲप डाऊनलोड करून घेण्याचे आव्हान करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन शेतजमिनीची प्रतवारी दुष्काळ अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या नोंदणीच्या आधारावरच शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जाते. पूर्वी ही नोंदणी तलाठ्याकडून केली जायची परंतु आता महसूल विभागाने ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप तयार करून शेतकऱ्यांनीच यात नोंद करायचे प्रावधान केले. पिकाचे फोटो अपलोड करून माहिती भरता येते. मात्र, ग्रामीण भागात नेटवर्कची मोठी समस्या आहे, ऑनलाईन पीक नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली.
चौकट
वीजपुरवठा अन् नेटवर्कचा ताळमेळ बसेना
बनकिन्होळा परिसरातील वरखेडी, भायगाव गेवराई सेमी, बाभूळगाव बु. या पाच गावांमध्ये कोणत्याही कंपनीचे मोबाईल टॉवर नसल्यामुळे मोबाईलची रेंज मिळत नाही. त्यात वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने मोबाईल चार्जिग कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.