उस्मानाबाद : उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीने खेळी करीत शिवसेनेत उभी फूट पाडली. परंतु, विषय समिती सभापती निवडीवेळी शिवसेना-भाजप आणि काँग्रेस हे एकत्र आल्याने राष्ट्रवादीने तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या. परंतु, भाजपाच्या वाट्याला आलेल्या दोन्ही उमेदवारांच्या अर्जांमध्ये त्रुटी निघाल्याने सदरील अर्ज बाद ठरले. त्यामुळे युती होऊनही भाजपाच्या पदरी निराशाच पडल्याने सेनेने संबंधित दोन्ही उमेदवारांना स्थायी समितीमध्ये स्थान दिले.जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद नगर परिषद उपाध्यक्ष निवडीवेळीही शिवसेना-भाजप आणि काँग्रेसने एकत्र येत भाजपाचे योगेश जाधव यांना उमेदवारी दिली होती. याचवेळी शिवसेनेचे सूरज साळुंके यांनी पक्षाचा व्हीप झुगारून उमेदवारी दाखल केली. हीच संधी साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय इंगळे यांची उमेदवारी मागे घेत सर्व ताकद साळुंके यांच्या पाठीशी उभी केली होती. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याने साळुंके विजयी झाले होते. दरम्यान, विषय समिती सभापतींच्या निवडीवेळी काय होते? याबाबतही मागील आठ दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी सेनेच्या एका गटाला मदत करणार की भाजपाला साथ देणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. असे असतानाच शिवसेनेकडूनही भाजप, काँग्रेसला सोबत घेऊन कुठल्याही परिस्थितीत सभापतीपदे राष्ट्रवादीकडे जाणार नाहीत, यासाठी फिल्डींग लावली होती.दरम्यान, शनिवारी सकाळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष बैठकीला सुरूवात झाली असता, ११ सदस्यांची समिती निश्चित करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे पाच, शिवसेनेचे ३, भाजपचे २ तर काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश झाला. त्यानंतर विषय समित्यांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. राष्ट्रवादी काय भूमिका घेते, याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असतानाच राष्ट्रवादीकडून एकाही समितीसाठी अर्ज दाखल केला गेला नाही. दुसरीकडे बांधकाम समितीसाठी शिवसेनेचे राजाभाऊ पवार, आरोग्य व स्वच्छता समितीसाठी काँग्रेसचे सिद्धार्थ बनसोडे, महिला व बालकल्याण समितीसाठी अनिता निंबाळकर, भाजपाकडून नियोजन समिती सभापतीपदासाठी अंजना पवार तर शिक्षण समितीसाठी प्रिया सुजित ओव्हाळ यांचेच अर्ज आले. भाजपाच्या सदरील दोन्ही उमेदवारांच्या अर्जावरील सूचक हे समितीतील सदस्य नसल्याने अर्ज बाद ठरविले. त्यामुळे ही दोन्ही सभापतीपदे आता रिक्तच राहणार आहेत. तर उर्वरित उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, विद्यमान उपाध्यक्ष सूरज साळुंके यांनी त्यांच्या अधिकारात पाणीपुरवठा समिती निवडल्याने या समितीचे सभापती ते स्वत: असणार आहेत. एकूणच शिवसेना, भाजप आणि काँग्रेस यांची आघाडी होऊनही भाजपाच्या पदरी निराशा पडल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. (प्रतिनिधी)
उमेदवारी अर्जांत त्रुटी; भाजपाचे उमेदवार आऊट
By admin | Published: January 08, 2017 12:07 AM