औरंगाबाद : शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांना पक्ष लयाला चालला, संपत चालला याकडे पाहण्यास वेळ नाही. रोज काही तरी विषय लागतो, म्हणून ए. यू. नावाला काऊंटर करण्यासाठी ईएसचा विषय त्यांनी पुढे केला, असा आरोप शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमानिमित्त औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर असलेल्या शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला. ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्येचा मुद्दा ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. परमार यांच्या डायरीतील ई. एस. नावाची एसआयटी मार्फत चौकशी करणार का, असे आव्हान ठाकरे गटांकडून खासदार संजय राऊत यांनी दिल्याचे पत्रकारांनी शिरसाट यांना सांगितले.
राऊत यांच्या या आव्हानाला शिरसाट यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले. ते म्हणाले की, ए. यू. नावाला काऊंटर करण्यासाठी ई. एस. पुढे करण्यात आले येत आहे. संजय राऊत यांना रोज नवा विषय हवा असतो. विनायक राऊत, संजय राऊत यांना पक्षाचे काहीही राहिलेले नाही. पक्ष लयाला चालला असल्याची चिंता त्यांना नाही, यांना फक्त आरोप करण्यात मजा वाटते. अडीच वर्षे ते सत्तेत होते. या कालावधीत त्यांनी ईएस कोण, डीएस कोण हे तेव्हाच त्यांनी काढायचे होते. मुळात त्यांना माहिती आहे, या प्रकरणात काही तथ्य नाही.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाचा झंझावात आहे. केवळ विकास हाच त्यांच्या कामाचा अजेंडा आहे. त्यांच्याकडे दुसरा विषय नसल्याने त्यांनी हा नवीन विषय काढला. अपुरी माहिती असल्याने ते अशी विधाने करीत असतात. शिवसेनेची अवस्था अशी आहे, की उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्ष चालवीतच नाहीत. पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून चालविण्यात येतो. संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असल्याचा आरोपही आ. शिरसाट यांनी केला.