औरंगाबाद : अल्पवयीन पत्नीला जिवंत जाळून तिचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केले. ही खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी घाटी रुग्णालयात घडली. दिलीप विठ्ठल राठोड (२३, रा. टाकरवण तांडा, ता. माजलगाव, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. ऊसतोडणीसाठी माजलगाव तालुक्यात दिलीपने १६ वर्षीय सोनाली जाधव (रा. अंतरवाला, ता. घनसावंगी, जि.जालना) या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणले होते. मंदिरात लग्न केल्यानंतर ते दोघे एप्रिल महिन्यापासून वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे भाड्याने राहत होते. दरम्यान, किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणानंतर दिलीपने सोनालीला पेटवून दिले. नंतर तो पसार झाला होता. उपचार सुरू असताना ४ जुलै रोजी पहाटे तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दिलीप विरोधात खून क रणे, बाललैंगिक अत्याचार आणि अॅट्रॉसिटी अॅक्टच्या कलमानुसार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार झालेल्या दिलीपला पोलिसांनी त्याच्या गावी जाऊन पकडून आणले. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली. कारागृहात त्याने डोके दुखत असल्याची तक्रार केली. त्यास एमआरआय विभागाकडे पोलीस घेऊन जात होते. यावेळी पोलिसांच्या हाताला झटका देऊन राठोडने गर्दीतून धूम ठोकली.
पोलिसांच्या तावडीतून आरोपीचे पलायन
By admin | Published: July 15, 2016 12:42 AM