शिक्षण ः वनसंरक्षण, विकासाचे मूल्य रुजवण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या सूचना
---
औरंगाबाद ः वनसंरक्षण व वनविकासाचे मूल्य रुजवण्यासाठी पाचवीच्या पुढील वर्ग असणाऱ्या शाळेत वाइल्ड लाइफ क्लबची स्थापना करा. त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांत जंगल व प्राणीजीवांची माहिती द्या. २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षांपासून हा उपक्रम सुरू करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिल्या आहेत.
वाईल्ड लाईफ क्लबच्या माध्यमातून वन्य प्राण्यांची माहिती मासिके, नियतकालीकांतून माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. संबंधित चित्रपट, माहितीपट दाखवणे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय उद्यानांची माहिती देणे, वन्यजीव सुरक्षा, जीवनचर्येची माहिती देणे, पर्यटनावेळीची काळजी, वन्यजीव सप्ताह, शहरी भागातील वाढलेला वन्यजीवांचा वावर यावर चर्चा घडवून आणणे. यासंबंधी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धांचे आयोजन, क्षेत्रभेटी, जैववैविध्यतेचे ज्ञान, पर्यावरणीय बदल आणि प्रदूषणाविषयी माहिती देण्याचे उपक्रम राबवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.