करमाड : करमाड पोलीस ठाणे हद्दीतील ७१ पैकी ६७ गावांत तर चिकलठाणा ग्रामीण ठाणे हद्दीतील २५ असे औरंगाबाद तालुक्यातील पूर्व भागात एकूण ९२ गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली.
गणरायाचे तालुक्यात सर्वत्र उत्साहात स्वागत करण्यात आले. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करमाड पोलिसांच्या वतीने अनेक गावांत बैठक घेऊन ‘एक गाव एक गणपती’ बसवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ६७ गावांत ‘एक गाव एक गणपती’ ची स्थापना करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी प्रत्येक गावात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यासाठी पोलिसांना मार्गदर्शन केले होते. करमाड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अजिनाथ रायकर नियोजन कार्यक्रम आखला व त्यादृष्टीने दोन्ही ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्कलनुसार गावात बैठका घेऊन तरुणांना व नागरिकांना आवाहन केले.
त्याला तालुक्यातील गणेश भक्तांनी प्रतिसाद देत पोलीस ठाणे हद्दीतील ७१ पैकी ६७ गावांत ‘एक गाव एक गणपती’ ची स्थापना करण्यात आली. तर चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाणाच्या हद्दीतील जवळपास २५ गावांत एकच गणपती बसविल्याची माहिती पो.नि. महेश आंधळे यांनी दिली. गणेश मंडळातील तरुणांनी व नागरिकांना गणपती उत्साहात व आनंदात साजरा करावा व कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.