किनवट : धावत्या पॅसेंजर रेल्वेसमोर आलेल्या कोठारी (चि़) येथील एका २२ वर्षीय तरूणाच्या डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाला़ आठ डब्ब्यांची संपूर्ण रेल्वे गाडी अंगावरून जावूनही हा तरूण बालंबाल बचावला़ त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असेच म्हणावे लागेल़ ही घटना किनवट-मदनापूर दरम्यान कोठारी (चि़) शिवारात १९ मे रोजी सायंकाळी सव्वाचारच्या दरम्यान घडली़ कोठारी येथील आशिष गोविंद कावळे हा तरूण किनवट-मदनापूर-बोधडी मार्गावरील कोठारी शिवारात रेल्वे पटरीवर बसून होता़ तो धावत्या रेल्वेसमोर आला़ त्याच्या डोक्याला जबर धडक बसून तो दोन्ही रूळाच्या मध्ये सापडला़ त्याच्या अंगावरून आदिलाबाद-पूर्णा पॅसेंजर रेल्वे गेली़ पण डोक्याशिवाय अन्य कुठेही त्यास मार लागला नाही़ आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या आशिष रेल्वेच्या धडकेत कसा सापडला याबाबत समजू शकले नाही़ संपूर्ण रेल्वे अंगावरून गेल्यावर समोर जावून थांबली व तत्काळ गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले़ तेथे डॉ़एम़एऩराठोड, डॉ़लोंढे, डॉ़अरूणा पोहरे, परिचारिका तांबारे यांनी उपचार केले़ प्रकृती चिंताजनक असल्याने संदर्भसेवा देत आदिलाबादला हलविले़ माजी नगराध्यक्ष अरूण आळणे यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठून तत्काळ उपचारासाठी हलवण्यासाठी मदत केली़ (वार्ताहर)
रेल्वेखाली येवूनही तरूण बालंबाल बचावला
By admin | Published: May 20, 2014 1:39 AM