औरंगाबाद : शालेय जीवनात शिक्षकाने दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर राजकारण, शिक्षण, समाजकारणात झेप घेता आली. या शिक्षकांसोबत त्यांच्या शेवटपर्यंत नियमित संपर्क होता. आता त्या शिक्षकांच्या तीन पिढ्या होत आहेत. त्या सर्वांसोबत ऋणानुबंध कायम असल्याची कृतज्ञता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केली.
घरकाम करून ज्ञान मिळविलेमाझ्या गावातील प्राथमिक शाळेत मुरलीधर वामन वाणी हे शिक्षक होते. ते १० वर्षे गावात होते. पहिली ते चौथीच्या वर्गाला तेव्हा एकच शिक्षक होता. या शिक्षकांच्या घरी पाणी आणून देणे, घर सारवणे, दूध आणून देणे, चहा करून देण्यासह इतर घरकामे आवडीने करायचो. त्यांचा मी आवडता विद्यार्थी होतो. फक्त घरकामेच करीत नव्हतो, तर गुरुजी उरलेल्या वेळेत मला ट्यूशन टाईप घरीच शिकवायचे. चौथी पास झाल्यावर गावात शाळा नव्हती, म्हणून औरंगाबाद तालुक्यातील नायगव्हाण येथे शिकायला जाण्यास सांगितले. त्या गावापासून मामाचे गाव पाच किलोमीटर अंतरावर होते. तेव्हा वाणी गुरुजींनी नायगव्हाणच्या शाळेतील पाटील सरांना सांगून माझ्यावर लक्ष ठेवायला लावले. वाणी गुरुजींनी गावात तर काळजी घेतलीच; पण दुसरीकडे गेल्यावरही काळजी घेतली. एवढे प्रेम माझ्यावर शिक्षकांनी केले.
वाटचाल सुकर शिक्षकरूपी गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आयुष्याची वाटचाल ही सुकर होत गेली. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्यांनी केलेल्या संस्कारांचा मला समाजकारण व राजकारणातही फायदा झाला. सामाजिक जीवन असो वा राजकारण जनतेने भरभरून आशीर्वाद दिला आणि माझे नेतृत्व विकसित होत गेले. या संस्कारांच्या शिदोरीवरच आतापर्यंत वाटचाल करीत आलो आहे. यापुढेही शिक्षकांचे व त्यांच्या पुढील पिढ्यांशी संबंध कायम राहतील.
शिक्षकांच्या विचारांचा पगडा अजूनहीशिक्षकांच्या संस्काराचा फायदा, त्यांची शिकवण आणि विचारांचा पगडा अजूनही माझ्यावर आहे. त्यांचा मला व्यावहारिक, सामाजिक आणि राजकीय जीवनात फायदा झाला. त्यांची तिसरी पिढी आहे. त्यांच्याही संपर्कात आहे. हा संपर्क कायम राहील.
कौटुंबिक संबंध निर्माण झाले वाणी गुरुजी सोयगाव तालुक्यातील गोंदेगावचे होते. ते असताना त्यांना भेटायला नेहमी जात होतो. आजही त्यांच्या पत्नी, मुलांकडे जातो. म्हणजे शाळेत आहेत तोपर्यंत रिलेशन नाही, तर त्यानंतरही रिलेशन आहेत. घरघुगती संबंध होते. यांच्यासह युसूफ रहमान पटेल, जालन्यातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयातील परिहार सर, दाभाडीचे गव्हाड सर, आहेर सर असे शिक्षक आणखी स्मरणात आहेत.
राजकारणात जनता हीच गुरूमाझ्या घरात, नात्यात कोणीही राजकारणात नव्हते. मला मतदारांनीच घडवले. गावाचा सरपंच केले तेव्हा गावाने घडवले. तालुक्याचा सभापती झालो, तेव्हा तालुक्यातील जनतेने मदत केली. पुढे जाफराबाद-भोकरदन तालुक्याचा आमदार झालो तेव्हाही त्या लोकांनी प्रेम केले. त्यानंतर पाच टर्म झाले जालना लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे. एकूण ३५ वर्षे आमदार-खासदार आहे. यात माझे फार काम आहे हे म्हणण्यापेक्षा लोकांनीच माझे नेतृत्व विकसित केले आहे. गत ३५ वर्षांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे लोकांचे अमाप प्रेम मिळाले. लोकांच्या गरजा, अपेक्षा आणि सांगतील ती कामे केल्यामुळे प्रेम करतात.
यशस्वी जीवनासाठी योग्य मार्गदर्शक आवश्यक असतो. त्यामुळे शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात समाधानी राहत आलो आहे. कुटुंब, राजकारण, समाजकारणात समाधानी जीवन जगत आहे. आयुष्य जगत असताना यापेक्षा अधिक काय असायला हवे. - रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय राज्यमंत्री