पैठण : पैठण शहरात विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन दोन दिवसात शहरात होणारा पाणीपुरवठा सुरळीत करा, सर्व प्रभागात योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्या असे आदेश यंत्रणेस दिले.
पैठण शहरात होणारा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला असून नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने विविध प्रभागातून पाण्यासाठी नागरिकांची ओरड सुरू आहे. राष्ट्रवादीचे गटनेते कल्याण भुकेले, शिवसेनेचे संतोष सव्वाशे, नगरसेवक अजित पगारे, आदींनी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या कानावर ही बाब घातली. नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी तातडीने पाणीपुरवठा सभापती आबा बरकसे यांच्यासह पाणीपुरवठा निरीक्षक व्यंकटी पापुलवार व पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याबद्दल यंत्रणेस धारेवर धरले. या वेळी पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी काय लागेल ते करा, अशा सूचनाही दिल्या.
जायकवाडी धरण सध्या काठोकाठ भरलेले असून पुरासोबत मोठ्याप्रमाणात काडीकचरा जलाशयात आला आहे. सदर कचरा पंप हाऊसच्या मोटारच्या फुटबॉलमध्ये वारंवार अडकत असल्याने पंपाची पाणी ओढण्याची क्षमता घटत असल्याने शहरात होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचे पाणीपुरवठा निरीक्षक व्यंकटी पापुलवार यांनी बैठकीत सांगितले.