औरंगाबाद : कोरोनाचा उद्रेक वाढताच रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. मागील अनुभव लक्षात घेऊन महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे ४ कोटी ५० लाख रुपये खर्च करून स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय नऊ महिन्यांपूर्वी घेण्यात आला. मात्र, प्रकल्पाच्या जागेवर ड्रेनेजचे आणि अग्निशामक दलाचे पाइप आढळून आले. त्यामुळे या प्रकल्पाची जागा बदलण्यात आली. याचे काम सुरू होत नाही तोच प्रशासनाने निर्णय फिरवत आता लिक्विडऐवजी हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट अद्याप कागदावरच असल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत होती. पालकमंत्र्यांनी त्वरित मेल्ट्रोन हॉस्पिटल येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याची सूचना केली. जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. १६ सप्टेंबर २०२० रोजी मनपा प्रशासनाने मंजुरी दिली. युद्धपातळीवर निविदा प्रकाशित केली. ऑक्टोबर महिन्यात निविदा उघडण्यात आल्या. डिसेंबर महिन्यात कंत्राटदाराशी दराबाबत वाटाघाटी केली. फेब्रुवारी २०२१ला सागर गॅस एजन्सीला लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याकरिता वर्क ऑर्डर देण्यात आली. मार्च महिन्यात पायाभरणी करण्यात आली. ड्रेनेजचे पाइप, अग्निशामक विभागाचे पाइप आढळून आल्याने ऑक्सिजन प्लांटची नियोजित जागा बदलण्यात आली. दोन दिवसांपूर्वी लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येऊ नये, असे आदेश दिले. हवेतून ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा बसवावी, असे आदेश दिले. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आता नव्याने निविदा काढावी लागणार आहे. त्यासाठी किमान दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ऑक्सिजन प्लांट उभारणीची नाट्यमय प्रक्रिया
१६ सप्टेंबर २०२० - लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता.
१६ ऑक्टोबर २०२० - महापालिकेकडे प्राप्त झालेल्या निविदा उघडण्यात आल्या.
२८ डिसेंबर २०२० - कंत्राटदारासोबत दर निश्चित करण्यासाठी वाटाघाटी झाल्याच नाहीत.
२४ फेब्रुवारी २०२१ - सागर गॅस एजन्सीला लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी वर्क ऑर्डर.
८ मार्च २०२१ - लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी पायाभरणी करण्यात आली.
३ मे २०२१ - लिक्विड ऑक्सिजन प्लांट रद्द करून, हवेतून ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा उभारण्याचा निर्णय.