बापू सोळुंके
औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रात्री ९ वाजेनंतर शहरातील सर्व बाजारपेठा बंद करण्याचा आदेश प्रशासनाने दिला हाेता. यासंदर्भात 'लोकमत'ने मंगळवारी रात्री ९ वाजेनंतर केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये मात्र प्रशासनाचा आदेश धुडकावून औरंगाबादकर रात्री १२ वाजेपर्यंत सुसाट होते, हे निदर्शनास आले. यात आणखी कहर म्हणजे अनेक ठिकाणी दुकानदार आणि ग्राहक विनामास्क फिरत होते.
विविध वसाहती आणि प्रमुख रस्त्यांवरील हॉटेल आणि दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असल्याचे या विशेष पाहणीत उघड झाले. शहरातील कोरोना ग्रस्तांची संख्या ३१ हजारांच्या पुढे गेली आहे. यामुळे मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री ९ वाजेनंतर बाजारपेठा बंद ठेवाव्या आणि रात्री ९ नंतर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत, असा इशारा दिला होता. मात्र यानंरतही औरंगाबादकरांनी ही गोष्ट किती गांभिर्याने घेतली आहे, हे रिॲलिटी चेकमध्ये स्पष्ट झाले.
रात्री ९ नंतर शहरातील पुंडलिकनगर, देवळाई चौक, शिवाजी नगर, पीरबाजार, रेल्वेस्टेशन, भडकल गेट या परिसरातील सर्वच दकाने सुरू होती. बुढीलेन, चंपाचौक, रोशनगेट, एमजीएम रूग्णालय परिसरातील हॉटेल ग्राहकांनी भरलेले होते. यातील बहुतांश लोकांनी मास्क घातलेले नव्हते. मुकुंदवाडी परिसरातील चहाचे हॉटेल तर रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होते. रात्री १०: ३० वा. रोशनगेट परिसर एखाद्या बाजाराप्रमाणे माणसांनी फुलून गेला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले हॉटेल, दुध डेअरी, ज्यूस सेंटर सुरू होते व तेथे मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते. यावरूनच एकीकडे दिवसेंदिवस कारोनाग्रस्तांची वाढती संख्या प्रशासनाच्या नाकी नऊ आणत असली तरी औरंगाबादकरांना मात्र कोरोनाचा जणू विसरच पडलाय की काय, असे जाणवत होते.