---
औरंगाबाद : जिल्ह्यात सर्वाधिक ३.९९ लाख हेक्टरवर कापूस लागवड अपेक्षित आहे. बागायती क्षेत्रातील बहुतांश शेतकरी ठिबक सिंचनाच्या मदतीने ७ जूनपूर्वीच कापूस लागवड करतात. मात्र, बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्यात पूर्वहंगामी कापूस लागवड हे महत्त्वाचे कारण आहे. १ जूननंतर बीटी कापूस बियाण्यांची विक्री सुरू झाली असली तरी १० ते १५ जूननंतर १०० मिलिमीटर पाऊस होऊन जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यावर मृगनक्षत्रात कापूस पिकाची लागवड करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी केले आहे.
यंदा चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने खरिपात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक सुमारे चार लाख हेक्टरवर कपाशी लागवड होणे अपेक्षित आहे. ही लागवड करताना १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांना थांबणे योग्य होईल. २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळला. त्यात पूर्वहंगामी लागवड हे महत्त्वाचे कारण शास्त्रज्ञांना आढळून आले. २५ मे ते ५ जून दरम्यान लागवड झालेल्या कापसावर सोयगाव तालुक्यातील पळाशी गावामध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे मागील हंगामात दिसले आहे, तर ५ जूननंतर लागवड झालेल्या कापसाची वाढ समाधानकारक होती.
१ जूनपासून कापूस पिकाच्या बियाण्याची विक्री सुरू आहे. मागील दोन ते तीन दिवसांमध्ये जिल्ह्यातील काही भागांमध्ये पूर्व मोसमी पाऊस झालेला असून, शेतकऱ्यांची लागवडीसाठी लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांनी १० ते १५ जूननंतर १०० मिलिमीटर पाऊस होऊन जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच कापूस पिकाची लागवड करणे योग्य होईल, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिला आहे.
---
पूर्वहंगामी कापूस लागवड बोंडअळीला निमंत्रण
--
पूर्वहंगामी कापूस लागवड झाल्यास गुलाबी बोंड अळीच्या सुप्तावस्थेतील कोशातून निघालेल्या पतंगांना लवकर खायला मिळते. त्याचप्रमाणे पूर्वहंगामी कापसाला फुलोरा येण्याची वेळ व अळीच्या सुप्तावस्थेतून निघालेल्या पतंगांची अंडी घालण्याची अवस्था यांचा कालावधी जुळतो. गुलाबी बोंड अळीची पहिली पिढी त्या क्षेत्रात वाढते व पुढे इतर शेतकऱ्यांच्या शेतावर प्रादुर्भाव करते.