औरंगाबाद : सध्याचे युग डिजिटल आहे. प्रत्येकाच्या हातात अँड्रॉईड मोबाईल आहे. कोणाकडे मोबाईल नाही, असा शोधूनही सापडणार नाही. अशा परिस्थितीतही क्वाईनबाॅक्स व लँडलाईन इतिहासजमा झालेले नाहीत. त्यांची ‘ ट्रिंग ट्रिंग’ अजूनही ऐकू येते. अर्थात, आणखी काही दिवसांत ही ‘ट्रिंग ट्रिंग’ बंद होण्याची शक्यता आहे.
............................................
२१हजार लँडलाईन
पूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात एक लाखाहून अधिक लँडलाईन होते. आता ही संख्या झपाट्याने कमी होत आहे. ‘बीएसएनएल’च्या सूत्रांनुसार जिल्ह्यात आता लँडलाईनची संख्या २२ ते २५ हजार असावी. औरंगाबादेत ‘व्हीआरएस’ घेतल्यामुळे ‘बीएसएनएल’च्या कर्मचाऱ्यांची संख्याही घटली आहे. आता ती १७० एवढी आहे. असे असतानाही दोन- दोन महिने त्यांचे पगार होत नाहीत. लोकांना फास्ट इंटरनेट पाहिजे. ते ‘बीएसएनएल’ उपलब्ध करून देऊ शकत नाही. शिवाय ‘बीएसएनएल’कडे सध्या ‘थ्री जी’ सुविधा आहे. मात्र, लोकांना आता ‘फोर जी’ व ‘फाईव्ह जी’ हवे आहे. फायबर कनेक्शनचे ४ हजार ५९२ लँडलाईन आहेत. दोन्ही मिळून जिल्ह्यात २१ हजार लँडलाईन आहेत.
......................................................................................................
क्वाईनबॉक्स नसल्यागतच
पूर्वी क्वाॅईनबॉक्सची आवश्यकता होती. सर्वसामान्य व गरजू लोक त्याचा वापर करीत असत. सध्या जिल्ह्यात कुठेच असे क्वाईनबॉक्स नाहीत. अंध व दिव्यांगाना रोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टीकोनातून सार्वजनिक ठिकाणी हे क्वाॅइनबॉक्स देण्यात आले होते. आता अशा क्वाईनबॉक्सची गरज नाही, किंवा त्याकडे कुणी फिरकतही नाही म्हणून आता क्वाईनबॉक्स कुठेच दिसून येत नाहीत.
...........................................................
एसटीडी-पीसीओचाही एक जमाना होता
मोबाईलचा जमाना सुरू झाला आणि १९९७ पासून लँडलाईन बंद होऊ लागले. औरंगाबादेतला पहिला एसटीडी पीसीओ मला मंजूर झाला होता. पहिला पेजरही मलाच मिळाला होता. एटीएनटी मोबाईलची एजन्सीही मलाच मिळाली होती. त्याकाळी लँडलाईनही मिळत नव्हते. आम्ही संघटना स्थापन करून लँडलाईनची चांगली सेवा मिळावी म्हणून टेलिफोनची अंत्ययात्रा काढली होती. या एसटीडी पीसीओमुळे त्या काळात सुमारे २५०० बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या होत्या. आता एसटीडी पीसीओही इतिहासजमा झालेत.
- सूरजितसिंग खुंगर, पहिले एसटीडी पीसीओधारक
..................................................................................
आता फक्त इनकमिंगसाठी लॅंडलाईन
मोठमोठ्या कार्यालयांमध्ये लँडलाईन वापरले जात आहेत. मोठ्या सरकारी कार्यालयांमध्येही लँडलाईन आहेत. खासगी लँडलाईन इनकमिंगसाठी वापरले जात असावेत. एसटीडी पीसीओची तर संकल्पनाच मोडीत निघाली. आता जमाना मोबाईलचा आहे. त्यातही रोज नवनवीन सुधारणा घडत आहेत. ग्राहकांची पसंती आता वेगवेगळ्या ‘फोर जी’ मोबाईललाच आहे.
- ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, मोबाईल विक्रेते.