छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य घटक पक्षांची महायुती आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले. महायुतीचे जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नसताना शिवसेनेने मराठवाड्यातील चार लोकसभा मतदारसंघात मोेर्चेबांधणी सुरू केली आहे. यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव या चार मतदारसंघांचा समावेश असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
फुटीनंतर शिवसेना प्रथमच लोकसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे वर्चस्व असल्याने पक्षाने मुंबईनंतर मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. महायुतीतील पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत मंगळवारी बैठक झाली. महायुतीचा जागा वाटप फार्म्युला अद्याप जाहीर झाला नाही. असे असले तरी शिंदे यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.
महायुतीच्या जागा वाटपात या जागा मुख्यमंत्री पदरात पाडून घेण्यात यशस्वी होतील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. यामुळे मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करण्याचे निर्देश पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत उपरोक्त चार मतदारसंघात शिवसंकल्प अभियान घेण्याचे नियोजन आहे. छत्रपती संभाजीनगरातून राज्याचे रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह आ. प्रदीप जैस्वाल इच्छुक असल्याची चर्चा आहे. आ. भुमरे यांनी तयारी सुरू केल्याचे आणि त्यांनी यापूर्वी तसे बोलूनही दाखवले आहे.