औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीची घोषणा केली आहे. दुसरीकडे, राज्यात ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समित्या किंवा नगरपालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सेना किंवा भाजपसोबत केलेली अभद्र आघाडी तात्काळ तोडण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाला धोका निर्माण होईल, असा काढला जात असलेला कयास खोटा ठरेल. काँग्रेसने सेनेसोबतची आघाडी तोडली, तरी सेनाही भाजपला सोबत घेऊन किमान सप्टेंबरपर्यंत तरी अध्यक्षपद हे आपल्याकडेच ठेवण्यात यशस्वी होईल, असे या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी बोलून दाखविलेल्या भूमिकांवरून स्पष्ट होते.शिवसेनेने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेत राज्यातील शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते; परंतु आज सोमवारी सायंकाळी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुंबईत युती झाल्याचे जाहीर केले. युती होण्याच्या हालचाली दिसताच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जि.प., पं.स. तसेच नगरपालिकांमधील सेना-भाजपसोबतची अभद्र आघाडी तोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींचे आदेश आम्हाला मान्य राहील. पक्षादेशानुसार आम्ही निर्णय घेऊ. दुसरीकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी मात्र सावध पवित्रा घेत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करायची की नाही, हे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल, तर शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी काँग्रेसने पाठिंबा काढला तरी आम्हाला काही फरक पडत नाही, असे ‘लोकमत’ला सांगितले. आपण भाजपला सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, आता जि.प. अध्यक्षांच्या टर्मचे तीनच महिने राहिले आहेत. आमच्यासमोर आता जि.प., पं.स. मधील सत्ता नव्हे, तर लोकसभा निवडणूक जिंकण्याचे टार्गेट आहे. यासंदर्भात पक्षनेत्यांच्या आदेशानुसार बघू.चौकट ...काँग्रेसने पाठिंबा काढला तर...जिल्ह्यात जि.प., औरंगाबाद पंचायत समिती, कन्नड पंचायत समिती, सोयगाव पंचायत समितीमध्ये शिवसेनेची काँग्रेससोबत आघाडी आहे, तर वैजापूर पंचायत समितीमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादीची आघाडी आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अभद्र युती तोडली, तर जिल्हा परिषदेसह कन्नड, सोयगाव व वैजापूर पंचायत समित्यांमधील सत्ता समीकरणे बदलू शकतात.
काँग्रेसने पाठिंबा काढला तरी अध्यक्षपदाला धोका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:11 PM
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीची घोषणा केली आहे. दुसरीकडे, राज्यात ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समित्या किंवा नगरपालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सेना किंवा भाजपसोबत केलेली अभद्र आघाडी तात्काळ तोडण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.
ठळक मुद्देयुतीच्या घडामोडी : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये सत्ता बदलाची चर्चा