- राम शिनगारे औरंगाबाद : १०० पैकी १०० गुण मिळाल्यानंतरही दहावीच्या ५९४ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांसाठी अर्ज करून झेरॉक्स प्रती मागविल्या. मात्र, हे करताना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विशिष्ट नियमामुळे काही विद्यार्थ्यांचे एक किंवा दोन गुण कमी झाल्याची माहिती विभागीय मंडळातील सूत्रांनी दिली.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात विभागीय मंडळाचा निकाल १७ टक्क्यांनी वाढला आहे. तरीही कमी गुण पडल्याचा आक्षेप घेत ३२५ विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणी आणि ५९४ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मागविल्या आहेत.
उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत देताना मंडळाकडून दिलेल्या गुणांची पुनर्मोजणी आणि तपासणी करूनच छायांकित प्रत दिली जाते. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळालेल्या विषयांच्या उत्तरपत्रिकांचाही समावेश आहे. पैकीच्या पैकी गुण मिळाल्याची उत्तरपत्रिका नातेवाईक, मित्रमंडळींना दाखविण्यासाठी विद्यार्थी घेत असतात. त्यामुळे मंडळही अशा विषयांच्या उत्तरपत्रिका देताना काळजी घेते. या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी केली जाते. त्यात दहापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एका विषयाला पैकीच्या पैकी मिळालेले गुण कमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात संस्कृत, गणित, इतिहास आदी विषयांच्या उत्तरपत्रिकांचा समावेश आहे. मंडळाच्या नियमानुसार ही प्रक्रिया करण्यात येत असते.
विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर पेपर सुरुवातीला मॉडरेटरकडे जातात. तेथून संबंधित विषयांच्या शिक्षकांकडे तपासणीला दिले जातात. तपासणी झाल्यानंतर दिलेल्या गुणांची पडताळणी मॉडरेटरकडून केली जाते. तेथून मंडळात उत्तरपत्रिका आणि गुणांची यादी आल्यानंतर कोणत्या प्रश्नाला किती गुण दिले याची पडताळणी केली जाते. राज्य मंडळाकडे यादी पाठविल्यानंतरही त्याठिकाणी प्रश्नाच्या गुणांनुसार पडताळणी होते. त्यानंतर निकाल जाहीर केला जातो. यात निकालातील गुणदानावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्याची संधीही दिली जाते. यात बहुतांश नापास झालेले किंवा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मागतात, असेही मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
खेळाचे गुण पाठविण्यात शाळांची दिरंगाईदहावीच्या परीक्षेत खेळामध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्यास १५ गुण देण्याची तरतूद आहे. यानुसार खेळातील गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मुख्याध्यापक किंवा शाळेतील शिक्षकांनी क्रीडा अधिकाऱ्यांकडे पाठवावे लागतात. हे प्रस्ताव तपासून क्रीडा अधिकारी विभागीय मंडळाकडे पाठवत असतो. मात्र, औरंगाबाद विभागीय बोर्डाची परीक्षा देणाऱ्या ३९ खेळाडूंचे प्रस्ताव पाठविण्यात शाळांनी दिरंगाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रस्ताव क्रीडा विभागाकडून मंडळाकडे पाठविण्यासही दिरंगाई झाली आहे. आता निकाल जाहीर झाला असून, या विद्यार्थ्यांचे भवितव्य राज्य मंडळाच्या हातात असणार आहे. या विद्यार्थ्यांना गुण मिळण्यासाठी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे पाठपुरावा करीत आहेत.