छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महापालिकेतील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यानंतरही १ एप्रिल ते ८ मेपर्यंत मालमत्ता करातून ३० कोटी ६ लाख, पाणीपट्टीतून ४ कोटी ४ लाख असे मिळून ३४ कोटी वसूल झाले. मनपाच्या इतिहासात कोणत्याही आर्थिक वर्षाच्या प्रारंभी, कोणतेही फारसे प्रयत्न न करता नागरिकांनी स्वत:हून कोट्यवधी रुपयांचा कर भरला.
महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, उपायुक्त अपर्णा थेटे यांनी वर्षाच्या प्रारंभीच वसुलीसाठी सूक्ष्म नियोजन करून ठेवले. या नियोजनानुसार एप्रिल महिन्यातच मालमत्ताधारकांना एसएमएस पाठविण्यात आले. यापूर्वी कधीही मालमत्ताधारकांना एसएमएस प्राप्त झाले नव्हते. याशिवाय प्रशासनाने यंदा सप्ततारांकित धोरणाची अंमलबजावणी सुरू केली. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत कर भरला तर व्याजाची आकारणी होत नाही. जुलै महिन्यापासून २ ते २४ टक्क्यांपर्यंत व्याजाची आकारणी होते. व्याजाचा भुर्दंड टाळण्यासाठी नागरिकांनी यंदा कर भरायला सुरुवात केल्याचे दिसून येते. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५०० कोटींची वसुली करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अधिकारी, कर्मचारी व्यस्त आहेत. निवडणूक संपल्यावर वसुलीवर अधिक भर दिला जाणार आहे.
महिनाभरात वसुलीत वाढमालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमाने महिनाभरात ३४ कोटी रुपये वसूल झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी कधीही कर जमा झाला नव्हता. बहुतांश नागरिक आता ऑनलाइन पेमेंटसुद्धा करीत आहेत. घरबसल्या कर भरण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे.
निवडणुकीनंतर मोहीम राबविणारमहापालिका प्रशासन लोकसभेची निवडणूक संपल्यावर झोननिहाय वसुलीसाठी मोहीम राबविणार आहे. पूर्वी डिसेंबर, जानेवारी महिना आल्यावर वसुलीवर विशेष लक्ष दिले जात होते. आता प्रत्येक महिन्यात वसुलीचा आढावा घेतला जाणार असल्याचे प्रशासक यांनी यापूर्वीच सांगितले. वसुली न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईसुद्धा केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांकडून चांगला प्रतिसादएसएमएसच्या माध्यमाने आपल्याला यंदा किती कर भरायचा, हे नागरिकांना आता कळत आहे. याशिवाय सप्ततारांकित धोरणामुळे नागरिक कर भरण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र आहे. निवडणूक संपल्यावर झोननिहाय वसुलीसाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे.- अपर्णा थेटे, उपायुक्त, मनपा.
२०२४ मधील वसुली- मालमत्ता कर वसूल - १५७ कोटी- मालमत्ता कराचे उद्दिष्ट - ३५० कोटी- पाणीपट्टीची वसुली - २८ कोटी- पाणीपट्टीचे उद्दिष्ट - १३० कोटी.