- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेच्या निधीतून सीसीटीव्हीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने कोट्यावधी रुपयांचे नवीन सिमेंट रस्ते चक्क ब्रेकरच्या साह्याने फोडण्याचे काम सुरू केले. शहरातील रस्त्यांचे वाटोळे होत असताना महापालिकेने कंत्राटदारावर थेट गुन्हा दाखल करण्याचे सोडून स्मार्ट सिटीला आताशी केवळ नोटीस पाठविली आहे.
महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापनाला संबंधित कंत्राटदारावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस पाठविली. शहरात सामान्य नागरिकाने सार्वजनिक जागी थुंकल्यास तातडीने दंड वसूल करण्याची तत्परता महापालिकेचे पथक दाखविते. मात्र सिडकोत दोन ठिकाणी महापालिकेने दिलेल्या अटींचे पालन न करता सिमेंटचे रस्ता फोडूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यासंबंधी महापालिकेने केवळ नोटीस बजावली आहे. कंत्राटदाराने रस्ता अटीनुसार खोदला का, याची पाहणीही शहर अभियंता कार्यालयाकडून झालेली नाही. त्यामुळे केवळ उपचार म्हणून नोटीस बजावण्यात आल्याचे दिसते.
मागील आठवड्यात चिस्तिया चौकापासून हाकेच्या अंतरावर सिमेंट रस्ता खोदण्यात आला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्ता खोदल्याची किंचितही माहिती नव्हती. दोन दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराने एमजीएम ते जकात नाका रोडवर सिमेंट रस्ता ब्रेकरने खोदून टाकला. चार इंचांची केबल टाकण्यासाठी जवळपास एक फूट रुंद खोदकाम करण्यात आले. या खोदकामामुळे महापालिकेला हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. विशेष बाब म्हणजे ब्रेकरने रस्ता फोडल्याने त्याचे आयुष्य आणखी कमी होते. शहरात कोणीही महापालिकेचा रस्ता फोडला तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार सर्व वाॅर्ड अभियंत्यांना दिलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांना आठवण करून देण्यात येईल, असे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.
सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी येणारा खर्चडांबरी रस्त्याच्या तुलनेत सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी तीनपट अधिक खर्च करावा लागतो. एक स्क्वेअर मीटर रस्ता तयार करण्यासाठी २९५० रुपये खर्च येतो. एम-४० ग्रेडसाठी हा खर्च असतो. एम-३० ग्रेडमध्ये हाच खर्च २६५० रुपये खर्च येतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
१ कि.मी. सिमेंट रस्त्याचा खर्च९ मीटर रुंदी, ६ सिमेंटचा थर, स्टीलचा वापर नाही अशा कामांमध्ये १ कि.मी. रस्त्यासाठी जवळपास ७५ लाख रुपये खर्च येतो. एम-३० या प्रकारातील हा खर्च असतो. एम-४० मध्ये हा खर्च १० हजार रुपयांनी वाढतो; म्हणजेच ८५ लाख रुपये होतात.
स्मार्ट सिटीला पत्र दिलेस्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराने व्यापक प्रमाणात रस्ते खोदण्याचे काम सुरू केले आहे. रस्ता कशा पद्धतीने खोदावा याचे प्रात्यक्षिक आस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित कंत्राटदारांना करून दाखविले आहे. सध्या स्मार्ट सिटीकडून कामे होत असताना तज्ज्ञ मार्गदर्शक कोणीही उपस्थित नसतात. त्यामुळे संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा मानस आहे. या संदर्भात आपले लेखी म्हणणे मांडावे म्हणून पत्र पाठविण्यात आले आहे.- सखाराम पानझडे, शहर अभियंता, औरंगाबाद महापालिका