राजकीय भुकंपातही राष्ट्रवादी सुसाट; शिवसेना,कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 03:47 PM2022-06-22T15:47:08+5:302022-06-22T15:47:46+5:30
ही राजकीय उलथापालथ पैठण तालुक्यातील राजकारणाला मोठी कलाटणी देणारी आहे.
पैठण (औरंगाबाद): राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना पैठण मतदारसंघातील शिवसेनेचे बाजारसमितीचे संचालक, जि.प सदस्या शिल्पा कापसे यांचे पती ज्ञानेश्वर कापसे आणि काँग्रेसचे नगर परिषद गटनेते हसन्नोद्दीन कटयारे यांनी मुंबई येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दत्ता गोर्डे, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ यांची उपस्थिती होती.
ही राजकीय उलथापालथ पैठण तालुक्यातील राजकारणाला मोठी कलाटणी देणारी आहे. जिल्हा परिषद व नगरपरीषद निवडणुकीच्या तोडावर आपेगाव जि.प. सदस्य असलेल्या शिल्पा कापसे यांचे पती ज्ञानेश्वर कापसे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने सेनेला मोठा झटका बसला आहे. बिडकीनचे जि.प. सदस्य विजय चव्हाण यांच्या पाठोपाठ ज्ञानेश्वर कापसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने ग्रामीण भागात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली आहे. शिवसेनेच्या तिकीटावर ज्ञानेश्वर कापसे यांनी गत निवडणुकीत पत्नीस निवडून आणले होते. यंदाही याच गटातून निवडणूक लढवायची त्यांची ईच्छा आहे. परंतु, अलिकडे त्यांना पक्षातून चांगली वागणूक मिळत नसल्याने ते नाराज होतो. या नाराजीतूनच त्यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट् केला.
कॉंग्रेसचे गटनेते कटयारे राष्ट्रवादीत
पैठण नगर परीषदेचे गटनेते तथा काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष हसन्नोद्दीन कटयारे यांनी देखील काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. हसनोद्दीन कटयारे यांच्या प्रवेशाने शहरात कमकुवत झालेल्या कॉंग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. हसनोद्दीन कटयारे यांना जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे यांनी पैठण शहराध्यक्ष पदावर नियुक्त केले होते. दरम्यान, प्रदेश कॉंग्रेसवर वर्णी लागताच माजी मंत्री अनील पटेल यांनी शहराध्यक्ष पदावर त्यांचे पुत्र निमेश पटेल यांची निवड केली. शहराध्यक्ष पदाचा हा वाद विकोपाला गेला होता शेवटी हसनोद्दीन कटयारे यांना हे पद सोडावे लागले. यामुळे ते नाराज होते व याच नाराजीतून त्यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्ष प्रवेशावेळी दत्ता गोर्डे, आप्पासाहेब निर्मळ, अनील घोडके, विजय चव्हाण, आप्पासाहेब गायकवाड, गौतम बनकर, ज्ञानेश वाघ, कैलास चव्हाण, समद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.