मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान!

By स. सो. खंडाळकर | Published: July 6, 2023 01:05 PM2023-07-06T13:05:11+5:302023-07-06T13:05:39+5:30

बीड जिल्ह्यातील चारपैकी तीन आमदार अजित पवार समर्थक : वसमतचे आमदार राजू नवघरे तटस्थ!

Even in Marathwada, Ajit Pawar got support; Fauzia Khan, Rajesh Tope loyal to Sharad Pawar! | मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान!

मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान!

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातही अजितदादा पवार यांचेच पारडे जड असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या एकूण आठ आमदारांपैकी वसमतचे आमदार राजू नवघरे हे बुधवारी कोणत्याच गटाच्या मेळाव्याला गेले नव्हते. 

घनसावंगीचे राजेश टोपे व बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या समर्थनार्थ यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हजर होते. उदगीरचे संजय बनसोडे हे तर अजितदादांबरोबर मंत्रीच बनले आहेत. तसेच अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील हेही अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते. राज्यसभा सदस्य फौजिया खान या शरद पवारांबरोबर असून, मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण व शिक्षक आमदार विक्रम काळे हे अजितदादांबरोबर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष कैलास पाटील हेही अजित पवार यांच्याबरोबर आहेत.

ॲड. राजेश्वर चव्हाण (बीड जिल्हाध्यक्ष), विजयसिंह बांगर (युवक जिल्हाध्यक्ष) हे अजित पवार यांच्या बैठकीला हजर होते.

आमदार नवघरे प्रचारात व्यस्त
हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत एकमताने शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेण्यात आला होता. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी मुंबईत शरद पवार यांच्या बैठकीला हजेरी लावली. वसमतचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे मात्र प्रचारात व्यस्त आहेत. नवघरे हे अजित पवार यांच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे आधी संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, मतदारसंघात परतताच त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीतही त्यांनी हेच सांगितले. मात्र, पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी ते मतदार संघातच आहेत.

अजित पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला लातूर जिल्ह्यातील मंत्री संजय बनसोडे तसेच जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबासाहेब पाटील, शहराध्यक्ष मकरंद सावे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष भरत सूर्यवंशी, औशाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख, लातूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, माजी नगरसेवक नवनाथ अल्टे आदी पदाधिकारी अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते. शरद पवार यांच्या बैठकीला प्रदेश कार्यकारिणीतील प्रदेश सचिव बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय शेटे, प्रदेश सरचिटणीस आशा भिसे यांच्यासह युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवार यांच्या बैठकीला माजी मंत्री आ. राजेश टोपे, माजी आ. चंद्रकांत दानवे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष तथा जाफराबादच्या नगराध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने, राष्ट्रवादी कामगार आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा तौर, तर अजित पवार यांच्या बैठकीला माजी आ. अरविंद चव्हाण यांनी हजेरी लावली.

शरद पवारांसोबत नांदेडची राष्ट्रवादी काँग्रेस
नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि माजी आमदार मात्र शरद पवार यांच्यासोबत आहेत. जिल्हाध्यक्षांसह १६ पैकी १५ तालुक्यांतील तालुकाध्यक्षही बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीला उपस्थित होते. एकमेव भोकर तालुका कार्यकारिणी ही अजित पवार यांच्यासोबत आहे. बुधवारी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शहर जिल्हाध्यक्ष डाॅ. सुनील कदम, माजी आमदार प्रदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या बैठकीला हजेरी लावली.

उस्मानाबादच्या पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांकडे ओढा
उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी हे खा. शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीचा एकही आमदार किंवा खासदार नाही. यामुळे माजी आमदार राहुल मोटे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे हे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले होते. जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतरही पदाधिकारी शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहिले, तर प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी मात्र दोन्ही बैठकांना हजेरी लावली. त्यांनी अद्याप आपण कोणाकडे जायचे, हे ठरविले नसून कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर भूमिका स्पष्ट करू, असे सांगितले.

शरद पवारांसोबत परभणीचे आमदार, खासदार
राज्यसभा खासदार डॉ. फाैजिया खान, विधान परिषदेचे आमदार जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, विजयराव गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या बैठकीला हजेरी लावल्याचे दिसून आले. अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीला परभणी शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांच्यासह काहीजण उपस्थित हाेते.

छत्रपती संभाजीनगरहून माजी आमदार प्रा. किशोर पाटील, विजयअण्णा बोराङे, व्दारकाभाऊ पाथ्रीकर, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, सुधाकर सोनवणे, छाया जंगले पाटील, मेहराज पटेल, मयूर सोनवणे यांच्यासह पदाधिकारी शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहिले.

Web Title: Even in Marathwada, Ajit Pawar got support; Fauzia Khan, Rajesh Tope loyal to Sharad Pawar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.