आषाढातील माहेराची वाट कोरोनाने अडविली
स. स़ो. खंडाळकर
औरंगाबाद : आषाढ महिन्यात प्रत्येक नवविवाहिता आपल्या माहेरी जात असते. पण कोरोनामुळे आता सासुरवासिनींना माहेर दुरावले आहे.
कोरोना काळात विवाहांची नोंद
जानेवारी ते डिसेंबर २०२०-३२१ कोर्ट मॅरेज
जानेवारी २०२१ ते जून २०२१ पर्यंत-२४२ कोर्ट मॅरेज
............
कोरोनाला वाकुल्या दाखवत जोरात लग्नसोहळे....
कोरोनाला वाकुल्या दाखवत, पोलीस परवानगी घेत औरंगाबाद शहरात विवाह होतच आहेत. शहरात लहान-मोठी २५० च्या जवळपास मंगल कार्यालये आहेत. शहरात दरवर्षी किमान सहा हजारांपेक्षा अधिक लग्नसोहळे पार पडत असतात. २०२० साली ऐन लग्न सराईतच कोरोना संसर्गाचा प्रारंभ झाला. त्यामुळे मार्च ते ऑक्टोबरपर्यंत मंगल कार्यालये बंदच होती. यावर्षी मागील सहा महिन्यांत ५० वऱ्हाडींची मर्यादा पाळून मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडले. पोलीस आयुक्तालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार एप्रिलपर्यंत चार हजार अकरा लग्नांचा बार उडाला. आता जुलैपर्यंत हा आकडा आणखी वाढलेला आहे. आता लग्नासाठीची परवानगी पोलीस आयुक्तालयातून मिळत नाही. ही परवानगी महापालिकेतून घ्यावी लागते.
...............
नेहमीच माहेरची ओढ....
नेहमीच माहेरची ओढ लागलेली असते. एखादा सण जवळ आला की माहेरची आठवण येतेच. बालपण आठवते. माझे माहेर तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव. पण सासरीही मला माहेरच्या प्रमाणेच प्रेम मिळते. त्यामुळे मी आनंदी व सुखी आहे.
- शीतल अमित पुजारी, औरंगाबाद.
................
प्रथा-परंपरा मोडीत निघताहेत....
आषाढ महिन्यातच नव्हे तर कोरोनामुळे कधीच कुठे जाता येणे जोखमीचे झाले आहे. या संसर्गाची धास्तीच तेवढी आहे. पूर्वी मी दिवाळीला हमखास माहेरी सोलापूरला जायची. आता कोरोनामुळे तेही शक्य झालेले नाही. प्रत्येक विवाहितेला माहेरी जाण्याची नेहमीच ओढ लागलेली असते. सण हे निमित्त होतं. पूर्वीच्या ज्या प्रथा-परंपरा होत्या त्या कोरोनामुळे मोडीत निघत आहेत. माहेरी जाऊन रिलॅक्स होण्याचे पोरीबाळींचे सुखही या कोरोनाने हिरावून घेतले.
- आरोही परिमल देशपांडे, सातारा परिसर, औरंगाबाद.