औरंगाबाद : या वर्षातील दुसरा लग्नहंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र, अजूनही वरात व बँड वाजविण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नाही. मागील ७ महिन्यांपासून बँडचा सूर हरवला आहे. यामुळे जिल्ह्यातील ४५० बँडपथके व त्यातील सुमारे ७ हजार कलाकार बेरोजगार झाले आहेत.
याच महिन्याच्या २७ तारखेपासून लग्नसराईला सुरुवात होत आहे. मंगल कार्यालये बुक होऊ लागली आहेत; पण या लग्नाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या बँडपथकांना मात्र बँड वाजविण्यास अजून परवानगी दिली नाही. यामुळे वरात निघणार की नाही, याबद्दल अजूनही अनिश्चितता कायम आहे. कोरोनामुळे ऐन एप्रिल, मे, जून या लग्नहंगामात लॉकडाऊन होते. याचा मोठा फटका मॅरेज इंडस्ट्रीला बसला. त्यात सर्वात अधिक हाल बँडपथकातील कलाकारांचे झाले . यामुळे बँडपथकाच्या कलाकारांमधून संताप व्यक्त केला जात आहे. बँडपथकात अशिक्षित कलाकारांची संख्या अधिक आहे. त्यातील अनेक जण भाजीपाला विकणे, माती काम करणे, हॉटेलवर काम करीत आहेत.
औरंगाबाद शहर बँड संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ४५० लहान-मोठे बँडपथके आहेत. त्यातील ३२ प्रमुख बँडपथके शहरात आहेत. प्रत्येक बँडपथकात १० ते ३५ कलाकार असतात. बँड पथकाचे मालक व कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळीत आम्ही कलाकारांना ३ ते ४ हजार रुपये बोनस देत असतो. यंदा दैनंदिन खाण्याचे वांधे आहेत.
आंदोलन केले; परिणाम झाला नाहीनागपूरपासून सर्वत्र वराती काढण्यास व बँड वाजविण्यास परवानगी दिली आहे. २० कलाकारांची मर्यादा घालून दिली आहे. बँडपथकाला परवानगी देण्यात यावी यासाठी आंदोलन केले; पण परिणाम झाला नाही.- अशोक मोरे, अध्यक्ष, औरंगाबाद शहर बँड असोसिएशन
यंदाचे मुहूर्त :नोव्हेंबर २७, ३०. डिसेंबर ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७जानेवारी ३, ५, ६, ७, ८,९, १०एप्रिल २२, २४, २५, २६, २८, २९, ३०. मे १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१. जून ४,६,१६,१९,२६,२७,२८जुलै १,२,३,१३