साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री शीतल प्रकाशात वन्य विभागाकडून जंगलांतील पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांची गणना होत असते. मात्र, वन्यप्राण्यांना कोरोनाची लागण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही ही गणना होऊ शकलेली नाही.
मानवी वसाहती आता हळूहळू जंगलात अतिक्रमण करण्यासाठी सरकत आहोत. अनेकदा नागरी वसाहतींत बिबट्या, तरस अन्य प्राणी आल्याची चर्चा होत आहे. जंगलात वन्यजीवांच्या संख्येत किती वाढ झाली, त्याचा नेमका आकडा पाहण्यासाठी दरवर्षी ही गणना केली जाते. परंतु कोरोनाच्या काळात दोन वर्षांपासून बुद्ध पौर्णिमेला वन्यजीवांची गणना केलेली नाही. जंगलांत सध्या वन्य जीवांची अन्न साखळी अखंड ठरलेली आहे. त्यामुळे प्राणी जंगलात बिनधास्त वास्तव्यास आहेत. हैद्राबादेतील प्राणी संग्रहालयात कोरोनाचा संसर्ग वन्यजीवांना झाल्याने त्यावरून कडक प्रतिबंध करण्यात आले आहेत. यंदाही जंगलात जाण्यास मानवाला बंदीच घातलेली आहे. तर वन कर्मचारी अधिकारी देखील जंगलात कमी प्रमाणात जात आहेत. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आलेली आहे. गौताळा अभयारण्यात गतवर्षीप्रमाणे यंदा वन्य जीवांची गणना होऊ शकलेली नाही.
मचाणावरुन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गणना
दरवर्षी वन्यजीव विभागामार्फत वन्यजीवांची गणना केली जाते. त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा चमूमध्ये समावेश असतो. बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात टिपण करणे सोयीचे ठरते. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे मचाण तयार केले जाते. सध्या टेक्नॉलॉजीचे युग असल्याने कॅमेऱ्याचा देखील उपयोग केला जातो. म्हणजे अचूक आकडेवारी काढण्यास सोयीचे ठरते. कोरोनामुळे दोन वर्षांपासून गणना टळली असल्याची खंत वन्यजीवप्रेमींतून व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचे दुसऱ्यांदा सावट...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने तसेच वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार वनविभागाचे कर्मचारी तसेच पर्यटकांना तर जंगलात जाण्यास मज्जाव केलेला आहे. नैसर्गिक वातावरण वन्यजीवांसाठी अत्यंत चांगले असून, बुद्ध पौर्णिमेला दुसऱ्यांदा वन्यजीवांची गणना टळलेली आहे. वन्यजीव विभागाने अधिक खबरदारी घेतलेली आहे.
- विजय सातपुते (विभागीय वनअधिकारी, गौताळा)