औरंगाबाद : तब्बल वर्षभरानंतर घाटी रुग्णालयातील निवासस्थानातील अनधिकृत रहिवाशांवरील कारवाईची मोहीम मंगळवारी (दि.२९) पूर्ण झाली. नऊ दिवसांच्या मोहिमेमध्ये अनधिकृत रहिवाशांची हकालपट्टी करीत घाटी प्रशासनाने ६९ निवासस्थानांचा ताबा घेतला, तर निवासस्थान सोडण्यास नकार देणाऱ्या ७ प्रकरणांची बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे, अशी माहिती उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.
या मोहिमेमध्ये मंगळवारी ‘बी’ ब्लॉकमधील इमारतींतील अनधिकृत रहिवाशांवर कारवाई करण्यात आली. डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, डॉ. राहुल पांढरे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. यावेळी अनधिकृत रहिवाशांना बाहेर काढून १४ निवासस्थानांना टाळे लावण्यात आले.
घाटी रुग्णालयातील निवासस्थानातील गैरप्रकार ‘लोकमत’ने १० मार्च २०१७ रोजी ‘शासकीय क्वॉर्टर्सवर अनधिकृत ताबा’ हे वृत्त प्रकाशित करून समोर आणला. या प्रकाराची दखल घेत घाटी प्रशासनाने उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली; परंतु प्रत्यक्षात कारवाईला मुहूर्तच सापडत नव्हता.
तब्बल वर्षभरानंतर २१ मेपासून अनधिकृत रहिवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. निवासस्थानातील काही अनधिकृत रहिवाशांनी निवासस्थान रिकामे करण्यास नकार दिला. घाटीत नातेवाईक कार्यरत असल्याचे म्हणत वाद घातला. अशा विविध ७ प्रकरणांत बेगमपुरा पोलीस ठाण्यास कारवाई करण्याबाबत कळविण्यात आले आहे, अशी माहिती घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली.